अनंत मानेंचे स्मारक उभारणार

By Admin | Published: June 28, 2015 12:53 AM2015-06-28T00:53:48+5:302015-06-28T00:55:28+5:30

परिसंवादाला प्रतिसाद : जन्मशताब्दी वर्षात भव्य सांगता समारंभाचे नियोजन

Anant Mannek Memorial will be set up | अनंत मानेंचे स्मारक उभारणार

अनंत मानेंचे स्मारक उभारणार

googlenewsNext

कोल्हापूर : अनंत माने हे ‘मराठी माती आणि माणसांची नाळ’ जाणणारे दिग्दर्शक होते. दुर्दैवाने त्यांनी चित्रपटसृष्टीत दिलेल्या योगदानाची फारशी दखल घेतली गेली नाही. मात्र, अनंत माने यांंचे भव्य स्मारक उभारण्याचा मनोदय शनिवारी झालेल्या परिसंवादात चित्रपटसृष्टीतील मान्यवरांनी व्यक्त केला. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा सांगता समारंभही भव्य स्वरुपात करण्याचा निर्धारही करण्यात आला.
अनंत माने कृतज्ञता प्रतिष्ठानतर्फे शाहू स्मारक भवनातील बहुउद्देशिय सभागृहात अनंत माने यांच्या जन्मशताब्दीनिमित्त शनिवारी ‘अनंत माने : व्यक्ती आणि कलावंत’ या विषयावर विशेष परिसंवादाचे आयोजन केले होते. परिसंवादाला चाहत्यांनी उदंड प्रतिसाद दिला. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक
प्रा. चंद्रकुमार नलगे होते. व्यासपीठावर डॉ. श्रीकांत नरुले, शशिकांत चौधरी, ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी, हेमसुवर्णा मिरजकर उपस्थित होत्या.
जेष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांनी चित्रनगरी ही अनंत माने यांनी चित्रपट सृष्टीत नव्याने येणाऱ्या पिढीसाठी पाहिलेले स्वप्न होते. मी त्याचा साक्षीदार आहे, ३२ वर्षे झाली तरी दुर्देवाने त्यांचे हे स्वप्न साकार झालेले नाही. ते पूर्ण करणे हीच त्यांना आदरांजली ठरेल, असे सांगितले. अण्णांच्या जन्मशताब्दीचा सांगता समारंभ भव्य स्वरुपात करूया असे आवाहन करुन कुलकर्णी म्हणाले, अण्णांचे स्मारक कोणत्या स्वरुपात करायचे हे नंतर ठरविण्यात येईल, पण त्यांचे स्मारक उभे करायचेच.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. चंद्रकुमार नलगे म्हणाले, पुण्यात अर्धे आयुष्य घालविलेल्या अनंत माने यांनी कोल्हापूरची चित्रपटसृष्टी जगविण्यासाठी येथील कलाकार, तंत्रज्ञांसाठी परत आले. शासनाने, नव्या पिढीने त्यांच्या कार्याची जाण ठेवली पाहिजे.
अभिनेत्री हेमसुवर्णा मिरजकर म्हणाल्या, आण्णांनी त्यांच्या चित्रपटात समूहदृश्यामधील नृत्यांगणा म्हणून सर्वप्रथम संधी दिली. त्यानंतर त्यांनी ‘कलावंतीण’ चित्रपटाचे नृत्यदिग्दर्शन मला करायला लावले. त्यानंतर सातत्याने आण्णांच्या हाताखाली काम करण्याची संधी मिळाली.
श्रीकांत नरुले म्हणाले, चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ ज्यांनी दिला, त्या कलाकारांमध्ये भालजी पेंढारकर आणि व्ही. शांताराम ही दोन विद्यापीठे होती. त्यात अनंत माने हे तिसरे विद्यापीठ होते. अनंत माने वेळेचे फार पक्के होते. उशीर झालेला त्यांना चालत नसे. राजा गोसावी, रमेश देव, जयश्री गडकर, अशा कितीतरी कलावंतांना त्यांनी प्रथम संधी दिली.
प्रा. शशिकांत चौधरी म्हणाले, अनंत माने यांनी ५८ वर्षांत ५८ चित्रपट निर्माण केले. मात्र, त्यांच्यावर अन्याय झाला. चित्रभूषण पुरस्कार न मिळाल्याची त्यांना खंत नव्हती, पण व्ही. शांताराम पुरस्कार न मिळाल्याचे सल राहिली. कोल्हापुरातच चित्रपटावर फारसे संशोधन न झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
दिग्दर्शक यशवंत भालकर यांनी अनंत माने यांना सरकारी पुरस्कार मिळाले नसले तरी लोकांनीच चित्ररत्न पुरस्कारदिल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. कविता गगराणी यांनी चित्रपट संशोधनाच्या कामात अनंत माने यांनी सहकार्य केल्याचे सांगितले. ज्येष्ठ अभिनेत्री सरोज सुखटणकर यांनीही अण्णा नेहमी मला छोटी सुलोचना म्हणत, अशा आपल्या भावना व्यक्त केल्या. मंजुश्री गोखले यांनी सूत्रसंचालन केले तर प्रफुल्ल महाजन यांनी आभार मानले.
लोकमतचा पुढाकार
ज्येष्ठ दिग्दर्शक अनंत माने यांच्या जन्मशताब्दी वर्षातच चित्रपट सृष्टीला त्यांचा विसर पडला आहे. यामुळे लोकमतने जाणीवपूर्वक अनंत माने यांच्याविषयी मे महिन्यात अनंत आठवणी या नावाने दोनवेळा विशेष पुरवणी प्रकाशित केली. याशिवाय चित्रपटसृष्टीने पुढाकार घेउन अनंत माने यांच्या कार्याची दखल घेण्याचे आवाहन केले होते. याचाच परिणाम म्हणून अनंत माने कृतज्ञता प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली.
कन्या गहिरवल्या..
अनंत माने यांच्या कन्या माणिक भोसले, जावई विलास भोसले, नातू नितिन आवर्जुन या कार्यक्रमाला उपस्थित होते.
इतक्या वर्षानंतर वडिलांचे चाहते इथे जमल्याचे पाहून त्यांच्या कन्या माणिक गहिवरल्या. भाषणाचा पिंड नसतानाही त्यांनी अण्णांच्या आठवणी सांगून उपस्थितांचे मन जिंकून घेतले. दोन भाऊ आणि मी अशी आम्ही तीन भावंडे. मी एकुलती एक असल्याने आण्णांचा जीव होता. लहानपणी मी आण्णांच्या चार चित्रपटांत कामही केले. एका चित्रपटासाठी पुरस्कारही मिळाला. त्यावेळी आण्णांच्या चेहऱ्यावरचा आनंद मला आजही आठवतोय. माझे लग्न झाल्यानंतर ते खूपच हळवे झाले होते. म्हणूनच त्यांनी ‘पाहुणी’ चित्रपट केला.
अनंत चाहता
या कार्यक्रमाला अनंत फुटाणे हे अनंत माने यांचे चाहते उपस्थित होते. त्यांनी आण्णांचे ५८ पैकी ५२ चित्रपट आठ वेळा पाहिले आहेत. या कार्यक्रमात त्यांचा गौरव करण्यात आला.

Web Title: Anant Mannek Memorial will be set up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.