अनंत झेंडे यांना ‘माउली आनंदी’ पुरस्कार, विश्वनाथ महाराज रुकडीकर शताब्दी पुण्यस्मरण सोहळा मंगळवारपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 11:09 AM2019-01-25T11:09:26+5:302019-01-25T11:12:22+5:30
श्री सद्गुरू दादा महाराज सांगवडेकर सेवा प्रतिष्ठानतर्फे ३० जानेवारी ते ८ फेब्रुवारी या कालावधीत परमपूज्य श्री सद्गुरू विश्वनाथ महाराज रुकडीकर यांच्या शताब्दी पुण्यस्मरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा संगीताआक्का सांगवडेकर व रामराया सांगवडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांनी श्रीगोंदा (जि. अहमदनगर) येथील महामानव बाबा आमटे सेवा संस्थेचे संचालक अनंत झेंडे यांना यावर्षीच्या ‘माउली आनंदी पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात येणार असल्याचे जाहीर केले.
कोल्हापूर : श्री सद्गुरू दादा महाराज सांगवडेकर सेवा प्रतिष्ठानतर्फे ३० जानेवारी ते ८ फेब्रुवारी या कालावधीत परमपूज्य श्री सद्गुरू विश्वनाथ महाराज रुकडीकर यांच्या शताब्दी पुण्यस्मरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा संगीताआक्का सांगवडेकर व रामराया सांगवडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांनी श्रीगोंदा (जि. अहमदनगर) येथील महामानव बाबा आमटे सेवा संस्थेचे संचालक अनंत झेंडे यांना यावर्षीच्या ‘माउली आनंदी पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात येणार असल्याचे जाहीर केले.
या सोहळ्याची सुरुवात बुधवारी (दि. ३०) सकाळी आठ वाजता श्री सद्गुरू विश्वनाथ महाराज पालखी सोहळ्याने होणार आहे. मिरजकर तिकटीच्या विठ्ठल मंदिर येथून शोभायात्रेस सुरुवात होईल. महाद्वार रोडमार्गे सद्गुरूंच्या पादुका अंबाबाई मंदिरात देवीच्या दर्शनासाठी जातील. नंतर त्या भवानी मंडपमार्गे विश्वपंढरी येथे येतील. यानंतर शंकराचार्य श्री विद्यानृसिंह भारती यांचे आशीर्वचन होईल. तसेच रोज सकाळी व सायंकाळी श्री ज्ञानेश्वरी पारायण, मान्यवरांची प्रवचने, कीर्तन होणार आहे.
अनंत झेंडे यांना ५ फेब्रुवारीला सायंकाळी सव्वासहा वाजता माउली आनंदी पुरस्काराचे वितरण होईल. रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व ज्ञानेश्वरीची प्रत असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. झेंडे यांनी २००८ साली बाबा आमटे, साधनाताई आमटे व डॉ. गिरीश कुलकर्णी यांच्याकडून प्रेरणा घेऊन विद्यार्थी सहायक समितीची स्थापना केली.
या संस्थेद्वारे साधना बाल भवन, आरंभ बालनिकेतन, जनजागृती व्याख्यानमाला, स्वातंत्र्यसेनानी रामलाल मेहता ग्रंथालय, भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम स्टडी सेंटर असे सामाजिक उपक्रम राबविले जातात. तरी नागरिकांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. परिषदेस आनंदनाथ महाराज, विलास सावंत, आदी उपस्थित होते.
महाआरोग्य शिबिर
या पुण्यस्मरण सोहळ्यांतर्गत १० दिवस महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यात पुण्यातील वैद्य समीर जमदग्नी व त्यांचे सहकारी रुग्णांची तपासणी व उपचार करणार आहेत. तसेच लहान मुलांसाठी विश्वप्रणाली संस्कार शिबिर होणार आहे.