मिरजकर तिकटीचा अपरिचित प्राचीन ‘चिंतामणी’

By admin | Published: September 18, 2015 12:39 AM2015-09-18T00:39:03+5:302015-09-18T00:44:13+5:30

करवीर माहात्म्याशी मिळताजुळता इतिहास : तीनशे वर्षांपूवी अरुण धर्माधिकारी यांच्या पूर्वजांना सापडली मूर्ती

Anchored by an unknown old 'Chintamani' of Mirajkar Ticket | मिरजकर तिकटीचा अपरिचित प्राचीन ‘चिंतामणी’

मिरजकर तिकटीचा अपरिचित प्राचीन ‘चिंतामणी’

Next

सचिन भोसले - कोल्हापुरात अंबाबाई मंदिराच्या भोवतालच्या परिसरात बहुतांश प्राचीन गणेशमूर्तीची मंदिरे आहेत. या मंदिरातील मूर्ती दीडशे, दोनशे वर्षांपूर्वीच्या आहेत. त्यातील बहुतांश मूर्ती कोल्हापूरकरांना अजूनही परिचित नाहीत, नव्हे तर अजूनही माहीतच नाहीत. अशापैकीच एक असलेल्या मिरजकर तिकटी येथील अरुण धर्माधिकारी यांच्या घरातील तीनशे वर्षांहून अधिक वर्षांच्या ‘चिंतामणी’ या गणेशमूर्तीविषयी.
तीनशे वर्षांपूर्वी मल्हार भट्ट धर्माधिकारी यांना घराच्या वाड्याच्या बांधकामावेळी मिरजकर तिकटी त्यावेळच्या अंबाबाई मंदिराच्या परिसरात अखंड पाषाणात कोरलेली चिंतामणी गणेशाची दोन फुटांची अखंड मूर्ती सापडली. या गणेशाची त्यांनी विधिवत पूजा करून घरातच या गणेशाची प्रतिष्ठापना केली. या मूर्तीशेजारी शंकर-पार्वती, गजेंद्रलक्ष्मी, हरतालिका यांच्या कोरीव मूर्तीही आहेत. धर्माधिकारी यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या घरात असलेला हा ‘चिंतामणी गणेश’ आजपर्यंत लोकांपासून दूरच ठेवण्यात आला आहे. या गणेशाचा महिमा ‘करवीर माहात्म्या’मध्ये वर्णन करण्यात आलेल्या गणेशाच्या मूर्तीशी मिळता-जुळता आहे.
ही गणेशमूर्ती पाषाणातील असून, आजपर्यंत ती धर्माधिकारी यांच्या वाड्यात एका बाजूला होती. कालांतराने अरुण धर्माधिकारी यांचे वडील विनायक धर्माधिकारी यांच्या निधनानंतर ज्येष्ठ चिरंजीव मल्हारी हे १९६०च्या दरम्यान भारत हेवी इलेक्ट्रीकल्स (भेल)मध्ये नोकरीला लागल्यानंतर मध्य प्रदेशात गेले. त्यानंतर ते तेथेच स्थायिक झाले. त्यामुळे धर्माधिकारी कुटुंबाची जबाबदारी अरुण यांच्यावर आली. त्यामुळे ते खासगी नोकरी करू लागले, तर धाकटे प्रमोद हे अंबाबाई मंदिरातील पूर्वापार वारशाने आलेल्या विष्णू मंदिराचे श्रीपूजक म्हणून काम पाहू लागले. त्यामुळे ही गणेशमूर्ती केवळ धर्माधिकारी यांच्या ‘घरचा गणेश’ म्हणून लोकांपासून अपरिचित राहिली.
सन २००५ ला वाडा पाडून या ठिकाणी अपार्टमेंट बांधली आहे. तिच्या खालच्या मजल्यावर एका बाजूला या ‘चिंतामणी गणेशा’च्या मंदिराची खोली बांधण्यात आली आहे.

ही गणेशमूर्ती तीनशे वर्षांपेक्षा अधिक काळाची, एकाच पाषाणात कोरलेली आहे. तीनशे वर्षांपूर्वी अंबाबाई मंदिराच्या परिसरात पाषाणातील गणेशमूर्ती काही श्रीपूजकांच्या वाड्यात ठेवण्यात आल्या होत्या. त्यापैकी ही प्राचीन मूर्ती आहे. पूर्वी या परिसरात खंदक होते. वाडे पाडल्यानंतर या मूर्ती या परिसरात सापडल्या. त्यातीलच एक प्राचीन मूर्ती आहे. सध्या ती केवळ घरातील मंदिरात असल्याने कोल्हापूरकरांपासून अपरिचित राहिली आहे. ‘करवीर माहात्म्या’तील मूर्तीशी साधर्म्य असली तरी ती ही मूर्ती नव्हे.
- उमाकांत राणिंगा,
प्राचीन मूर्ती, मंदिर अभ्यासक

Web Title: Anchored by an unknown old 'Chintamani' of Mirajkar Ticket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.