अन् सभापतींची सटकली..साहेब हे रोजचचं
By admin | Published: January 8, 2016 11:46 PM2016-01-08T23:46:09+5:302016-01-09T00:27:40+5:30
आजरा पंचायत समिती : अधिकारी, कर्मचारी शिस्तीचा प्रश्न ऐरणीवर
ज्योतीप्रसाद सावंत -- आजरा -शासकीय कार्यालये आणि त्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती हा चिंतेचा विषय आहेच; पण त्याचबरोबर कामचुकार कर्मचाऱ्यांचे करायचे काय? हा प्रश्नही आजरा पंचायत समितीच्या सभागृहात घडलेल्या सहायक गटविकस अधिकाऱ्यांच्या प्रकरणाने पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.पंचायत समितीचा कारभार नवीन प्रशासकीय इमारतीत सुरू झाल्यापासून काही अधिकाऱ्यांच्या खुर्च्या सतत रिकाम्याच दिसतात. एखादा अधिकारी अथवा कर्मचारीच प्रत्येक दालनात दिसतो हे वास्तव आहे. अधिकारी भागात गेले आहेत, जिल्हास्तरीय बैठकीसाठी गेले आहेत, रजेवर आहेत अथवा असतील इथेच कुठेतरी, ही नेहमीच्या पठडीतील उत्तरे ऐकावयास मिळतात.पंचायत विभागाची तर तऱ्हाच न्यारी. येथे विस्तार अधिकारी नेमके असतात कुठे, ग्रामपंचायतींना भेटी कधी देतात त्यांची नेमकी काय तपासणी करतात? किती दिवसांतून भेटी देतात, याबाबत अचूक माहिती गटविकास अधिकारीसुद्धा देऊ शकत नाहीत. त्यातून सार्वजनिक सुट्यांना जोडून कार्यालयांना भेटी दिल्यास सगळाच आनंदी आनंद.पंचायत समितीच्या सभांना किती अधिकारी हजर राहतात हा सुद्धा संशोधनाचा विषय आहे. दोन-दोन सभांना दांड्या मारून एखाद्या सभेला हाताखालचा कर्मचारी पाठवून वेळ मारून नेताना अधिकारी दिसतात. काही विभागांचे अधिकारी तर ही सभा व आपला काहीच संबंध नाही, अशा अविर्भावात वागताना दिसतात.आता अधिकारी-कर्मचारी शिस्तीचा प्रश्न गांभीर्याने पुढे येऊ लागला आहे. त्यामुळे सोनारानेच कान टोचायची गरज आता निर्माण झाली होतीच. सदर प्रकार सहनशीलतेबाहेर गेल्याने अखेर सभापती विष्णूपंत केसरकर यांची सटकली आणि थेट कामचुकारपणाचा आरोप करीत सहायक गटविकास अधिकाऱ्यांना सभागृहाबाहेरचा रस्ता दाखविला.वारंवार अधिकाऱ्यांना सूचना करूनही जर फरक पडत नसेल, तर असे प्रसंग घडणारच. नवा इतिहास घडणारच. आता यापुढे तरी ‘कामचुकार’पणाचा आरोप असणारे अधिकारी व कर्मचारी आपले वर्तन सुधारतील, अशी अपेक्षा करण्यास हरकत नाही.