...अन् मुश्रीफ यांनाही आलं गहिवरून; म्हाकवेतील 'त्या' तरुणाच्या कुटुंबीयांना लाखाची मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2021 05:04 PM2021-07-25T17:04:43+5:302021-07-25T17:25:53+5:30
Kolhapur : दोन दिवसांपूर्वी येथे ओढ्यातून वाहून गेलेल्या सचिन जयराम पाटील (वय ३०) याचा आज सकाळी ऊसाच्या शेतात मृतदेह आढळून आला.
- दत्ता पाटील
म्हाकवेः पुरात वाहून गेलेल्या म्हाकवे(ता.कागल) येथील सचिन जयराम पाटील या तरुणाच्या कुटुंबीयांचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भेट देऊन सांत्वन केले. तो नोकरीत असलेल्या रेमंड कंपनीसह, शेतकरी अपघात विमा, केडीसीसी बँकेची सभासद अपघात विमा यासह मुश्रीफ फाऊंडेशनच्या वतीने एक लाख रुपये तातडीची मदत जाहीर केली. तसेच सचिन यांची मुलगी शिवन्याच्या उच्च शिक्षणापर्यंतची जबाबदारीही मंत्री मुश्रीफ यांनी स्वीकारत मदतीचा हात पुढे केला.
दोन दिवसांपूर्वी येथे ओढ्यातून वाहून गेलेल्या सचिन जयराम पाटील (वय ३०) याचा आज सकाळी ऊसाच्या शेतात मृतदेह आढळून आला. तो कागल पंचतारांकित वसाहतीतील रेमंड कंपनीत कायम स्वरुपी नोकरीला होता.कर्त्या युवकांचा दुदैवी मृत्यू झाल्याने या कुटुंबीयांवर संकट ओढविल्याने हे कुटुंब उघड्यावर पडू नये यासाठी मुश्रीफ यांनी तात्काळ या कुंटुंबाला मदतीचे हात पुढे केले.
यावेळी तहसीलदार शिल्पा ठोकडे, गटविकास अधिकारी सुनिल संसारे,बिद्री'चे संचालक प्रविणसिंह भोसले,राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष शिवानंद माळी,माजी प स सदस्य ए.वाय.पाटील,सरपंच सौ.सुनिता चौगुले,उपसरपंच धनंजय पाटील,रमेश पाटील,सिद्राम गंगाधरे,हिंदुराव पाटील, आकाराम पाटील,डॉ.विजय चौगुले,दिनेश पाटील,रघुनाथ पाटील,जीवन कांबळे,सिताराम गोरे,अमित पाटील आदी उपस्थित होते. दरम्यान, येथील पुरपरिस्थीतीची पाहणी करून हसन मुश्रीफ फाऊंडेशनच्यावतीने पुरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.
अन् मुश्रीफ यांनाही आले गहिवरून...
"१५ वर्षापूर्वीच मातृ- पितृ छत्र हरविलेल्या सचिनवर कुटुंबीयांची जबाबदारी होती. मोठ्या परिश्रमातून हे कुटुंब सावरत होते. तोच कर्त्या सचिनवर काळाने घाला घातला. म्हाकवे-गोरंबे रस्त्यावर असणाऱ्या या कुटुंबीयांच्या घरी मुश्रीफ जाताच कुटुंबीयांनी चिमुकल्या शिवन्याचे काय होणार? असे म्हणत हंबरडा फोडला. यावेळी मुश्रीफ यांनी कुटुंबीयाला धीर देत शिवन्याच्या उच्च शिक्षणापर्यंतची जबाबदारी व एक लाख रुपयेही शिवन्याच्या नावे ठेवणार असल्याची घोषणा केली. तसेच, केडीसीसी बँकेसह रेमंड कंपनी व शासनाकडून मदत मिळवून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.