...तर पर्ल्स गुंतवणूकदारांचा दिल्लीत मोर्चा काढणार
By admin | Published: November 8, 2016 01:25 AM2016-11-08T01:25:14+5:302016-11-08T01:30:59+5:30
शंकर पुजारी यांचा इशारा : मेळाव्यात पर्ल्स गुंतवणूकदारांचे पैसे मिळण्यासाठी पुढील महिन्याची मुदत.
कोल्हापूर : गुंतवणूकदारांची पीएसीएल (पर्ल्स) कंपनीकडे अडकलेली हजारो कोटींपेक्षाही जास्त रक्कम पर्ल्स कंपनीच्या मालमत्तेची विक्री करून गुंतवणूकदारांना तत्काळ परत करावी, या मागणीसाठी मुंबईतील ‘सेबी’च्या कार्यालयावर मोर्चा यशस्वी झाला आहे. त्यामुळे ‘सेबी’कडून हालचाली सुरू झाल्या आहेत. डिसेंबरपर्यंत गुंतवणूकदारांचे पैसे मिळण्यास सुरुवात न झाल्यास, डिसेंबरअखेर दिल्लीत संसदेवर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती अखिल भारतीय पीएसीएल (पर्ल्स) गुंतवणूकदार संघटनेचे सचिव शंकर पुजारी यांनी पर्ल्स गुंतवणूकदार संघटनेच्या मेळाव्यात दिली.
अखिल भारतीय पीएसीएल (पर्ल्स) गुंतवणूकदार संघटनेच्यावतीने सोमवारी शाहू स्मारक भवनमध्ये जिल्ह्यातील गुंतवणूकदारांचा मेळावा झाला.
पुजारी म्हणाले, मुंबईतील ‘सेबी’च्या कार्यालयावर २५ आॅक्टोबरला आंदोलन यशस्वी झाले. त्यामुळेच समितीची कार्यवाही जोराने सुरू झाली असून, पर्ल्सची मालमत्ता लिलाव करून गुंतवणूकदारांना वाटपाची रक्कम गोळा करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्यामध्ये सेबीकडे पर्ल्सचे बँक खात्यामधील २१० कोटी रुपये व व्याज मिळून ३०० कोटी रुपये आहेत. अन्य लिलाव प्रक्रियेतून ५०० कोटी रुपये जमा झाले आहेत. याबाबत सेबीच्या कार्यालयामधून पर्ल्स गुंतवणूकदार जे वसुलीचे दावे दाखल करतात ते त्वरित दिल्लीस निवृत्त न्यायमूर्ती आर. एस. लोढा यांच्या कमिटीकडे पाठविले जात आहेत. या दाव्यांची रक्कम त्वरित मिळावी यासाठी डिसेंबरअखेर दिल्लीतील संसदेवर मोर्चा काढण्यात येणार आहे, तसेच शिष्टमंडळामार्फत अखिल भारतीय पीएसीएल (पर्ल्स) गुंतवणूकदार संघटनेतर्फे लोढा समितीची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात येणार आहे. सुमन पुजारी, समिना गरगरे, शंकर आढावकर, विठ्ठल फाकडे, शाम चिंचणे, बाळासाहेब लोहार, मारुती आजगेकर, विवेक पाटील, शिवाजी शेलार, रानबा गुरव, गोविंद देशपांडे यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी विजय बचाटे यांनी सूत्रसंचालन केले, तर महेश लोहार यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
चार जिल्ह्यांत एक लाख गुंतवणूकदार....
सांगली, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी जिल्ह्यांत एक लाख गुंतवणूकदारांची २००० कोटींपेक्षाही जास्त रक्कम पर्ल्स कंपनीच्या चक्रानुवर्ती गुंतवणूक योजनेत अडकली आहे. निवृत्त न्यायाधीश आर. एस. लोढा यांच्या अध्यक्षतेखाली सर्वोच्च न्यायालयाने समिती नेमून या कंपनीने मालमत्तेची विक्री करून गुंतवणूकदारांना रक्कम परत करावी, असा आदेश दिला आहे. ‘पर्ल्स’ची देशात एक लाख ८५ हजार कोटी रुपये किमतीची मालमत्ता आहे.
‘सेबी’कडे ३००० अर्ज
गुंतवणूकदारांची ‘पर्ल्स’कडील रक्कम परत मिळण्यासाठी संघटनेने अर्ज मागून घेतले होते. गुंतवणूकदारांकडून पुराव्यांकरिता गुंतवणुकीच्या सर्टिफिकेटच्या झेरॉक्स प्रती घेतल्या होत्या. हे अर्ज संघटनेमार्फत ‘सेबी’कडे जमा केले होते.पैकी ३००० जणांच्या पावत्या मंगळवारी गुंतवणूकदारांना दिल्या. संघटनेकडील छापील फॉर्म भरून तो जमा करावा, असे आवाहन संघटनेकडून करण्यात आले आहे.