...आणि त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले...! : बालिकेसह महिलेला केले जटामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 11:40 PM2019-05-21T23:40:55+5:302019-05-21T23:41:36+5:30
जन्मापासूनच वाढलेल्या जटाचं ओझं आणि चुकीच्या रुढी परंपरेमुळे समाजाने लादलेली अंधश्रद्धेची मानसिक गुलामगिरी दूर झाल्यामुळे त्यांच्या चेहºयावर विलक्षण असे हास्य फुलले. त्यामुळे उपस्थित सर्वांनाही खूप आनंद झाला
गडहिंग्लज : जन्मापासूनच वाढलेल्या जटाचं ओझं आणि चुकीच्या रुढी परंपरेमुळे समाजाने लादलेली अंधश्रद्धेची मानसिक गुलामगिरी दूर झाल्यामुळे त्यांच्या चेहºयावर विलक्षण असे हास्य फुलले. त्यामुळे उपस्थित सर्वांनाही खूप आनंद झाला. दहा वर्षांच्या यल्लव्वासह गावातील सुनिता शेंडगे याही जटामुक्त झाल्या.
हसूरचंपू (ता. गडहिंग्लज) येथील यल्लव्वा मारूती मसुरे या दहा वर्षे वयाच्या धनगर समाजातील मुलीला लहानपणापासूनच जट होती. तसेच गावातील सुनिता अर्जुन शेंडगे या मराठा समाजातील भगिनीलाही जट होती.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी अवघ्या १० वर्षांच्या यल्लव्वा या मुलीला जटा असल्याचे माजी सभापती प्रा. जयश्री तेली व संतोष तेली यांच्या निदर्शनास आले. दरम्यान, देवदासी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते चंद्रकांत तेलवेकर यांच्या मदतीने प्रा. तेली यांनी यल्लव्वाचे आई-वडील आणि अन्य नातेवाईकांचे प्रबोधन केले. जटामुक्त करून तिला शाळेत पाठवूया. तिच्या शिक्षणाचा खर्च करायलाही आपण तयार असल्याची ग्वाही प्रा. तेलींनी तिच्या कुटुंबियांना सांगितली. महिनाभराच्या पाठपुराव्यानंतर यल्लव्वासह तिचे नातेवाईक ‘जटा’ निर्मूलनासाठी तयार झाले.
तिच्यासोबत सुनिताताई यांनाही जटामुक्त करण्यात आले. याकामी ग्रामपंचायत सदस्य भीमा दुंडगे, आनंदा मसुरे, पांडुरंग कांबळे, हुवाप्पा करिगार यांनीही मोलाचे सहकार्य केले. प्रा. तेली यांच्या घरीच जटानिर्मूलनाचा कार्यक्रम झाला.