...अन् त्यांची दिवाळी झाली तेजोमय
By admin | Published: October 24, 2014 12:03 AM2014-10-24T00:03:50+5:302014-10-24T00:17:56+5:30
मातोश्री वृद्धाश्रम : सामाजिक संस्था, व्यक्तींकडून दिवाळीसाठी पाठबळ
एम. ए. पठाण -कोल्हापूर -किमान दिवाळी सणाच्या निमित्ताने तरी नातेवाईक आपल्याला भेटायला येतील, घरी घेऊन जातील, या आशेने त्यांच्या प्रतीक्षेतील थकलेले शरीर आणि थिजलेल्या डोळ्यांची निराशा झाली. मात्र, निराधारांना लाखमोलाचा आधार देणाऱ्या पाटोळे कुटुंबीय, सामाजिक संस्था आणि व्यक्तींच्या अखंड प्रेमाने त्यांचा आनंद द्विगुणित झाला. ‘मातोश्री’ वृद्धाश्रमात दिवाळी तेजोमय होत आहे.
पाचगाव येथील आर. के. नगरमधील मातोश्री वृद्धाश्रमात दिवाळीची धामधूम सुरू आहे. येथील आजी-आजोबांना नाही म्हटले तर ओढ असते आपल्या जिवाभावाच्या नातलगांची; पण काल, बुधवारी दिवाळी असूनही कोणाचेही नातेवाईक त्यांच्याकडे फिरकले नाहीत. अशा व्यथित आजी-आजोबांसाठी पाटोळे कुटुंबीयांनी दिवाळीचे नेटके नियोजन केले. दिवाळीदिवशी पहाटे अभ्यंगस्नान, त्यानंतर त्यांना संस्थेतर्फे कपडे देण्यात आली, तर सकाळी सामूहिक फराळाचा कार्यक्रम झाला. दिवाळीदिवशी या आजी-आजोबांच्या मनात नातेवाइकांना न भेटण्याची खंत असली तरी येथील वातावरणातून त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद बरच काही सांगून गेला. येथे एकूण १३० आजी, आजोबांची सुश्रुषा केली जाते.
काल वसंतराव चौगुले हायस्कूलतर्फे फराळाचे साहित्य, उद्योगपती अजित जाधव, शासकीय रुग्णालयातील एक्स-रे विभाग यांच्या हस्ते फराळ, मिठाई वाटप झाली. सायंकाळी कबीर शेख यांच्या हिंदी, मराठी गीतांचा कार्यक्रम झाला. त्यास येथील आजोबा-आजींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आज, गुरुवारी लक्ष्मी पूजनादिवशी सायंकाळी अरुंधती महाडिक यांच्या हस्ते मिठाई वाटप करण्यात आली. तसेच लक्ष्मी पूजन झाल्यानंतर आजी-आजोबा आतषबाजीत सहभागी झाले अन् मातोश्री आश्रमातील माहौलच पालटून गेला. यासाठी संस्थेचे संस्थापक शिवाजी पाटोळे, अॅड. शरद पाटोळे, लीला पाटोळे, राणी पाटोळे, रोहन पाटोळे व पूर्ण पाटोळे कुटुंबीय यासाठी राबत असते. तसेच सध्या ‘मातोश्री’मध्ये सामाजिक भान ठेवून काही संस्था, व्यक्ती उत्स्फूर्त मदत करत आहेत.
आपल्या अडचणीमुळे काही कुटुंबीय आपल्या वृद्ध आई, वडील अथवा नातेवाइकांना मातोश्री वृद्धाश्रमात सोडून जातात. या वृद्धांचा कुटुंबांप्रमाणे येथे सांभाळ केला
जात आहे; पण दिवाळीसारख्या सणादिवशी आपल्या वृद्ध आजी, आजोबांना भेटायला येथे येणे किंवा दिवाळीसाठी दोन दिवस घरी घेऊन जाणे हे घडत नसल्याची खंत वाटते. अशी मानसिकता बदलण्याची गरज आहे. -अॅड. शरद पाटोळे