Kolhapur: लाखो रुपयांची फसवणूक; हुपरीच्या राजेंद्र नेर्लेकरला आंध्र प्रदेश पोलिसांनी केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2023 11:51 AM2023-12-28T11:51:17+5:302023-12-28T11:52:50+5:30
भावालाही घेतले ताब्यात
हुपरी (कोल्हापूर) : जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून विविध राज्यांतील शेकडो जणांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी वादग्रस्त ठरलेला हुपरी (ता. हातकणंगले) येथील राजेंद्र भीमराव नेर्लेकर व त्याचा भाऊ अनिल भीमराव नेर्लेकर यांना आंध्र प्रदेश पोलिसांनी बुधवारी रात्री अटक केली. शेळी-मेंढीपालन व्यवसायाच्या माध्यमातून मोठा फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवून आंध्र प्रदेशात फसवणूक केल्याचा त्याच्यावर गुन्हा दाखल आहे.
विविध प्रकारचे उद्योग उभारणी करणे, शेळी-मेंढीपालन तसेच विविध प्रकारच्या करन्सीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा लाभ मिळवून देतो, अशी आमिषे दाखवून राजेंद्र नेर्लेकर याने मधाळ बोलण्याने देशभरातील शेकडो जणांना फसविले आहे. त्याच्या विरोधात अनेक राज्यांत गुन्हे दाखल आहेत.
राजेंद्र नेर्लेकर याच्या मुलाचे सोमवारी नृसिंहवाडी येथे लग्न झाले. बुधवारी त्यांच्या घरी सत्यनारायण पूजन होते, त्यानिमित्त संत बाळूमामा पालखी आणण्यात आली होती. दारात मिष्टान्न जेवणाच्या पंगती उठवल्या जात होत्या. याचवेळी आंध्र प्रदेश पोलिसांनी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास राजेंद्र व त्याचा भाऊ अनिल याला ताब्यात घेऊन अटक केली.
नेर्लेकर याने निमित्तसागर महाराजांसारख्या तपस्वीलाही सोडले नसून त्यांची सुमारे ३५० कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. ही रक्कम परत मिळावी, यासाठी महाराजांनी त्याच्या दारातच उपोषण सुरू केले होते.
लोकमतने फोडली वाचा..
राजेंद्र नेर्लेकर याच्या फसवणूक प्रकरणाचा लोकमतने १८ डिसेंबरच्या अंकात सर्वप्रथम पर्दाफाश केला. त्यामुळे त्याच्या फसवणूक प्रकरणाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू झाली. अनेकांनी लोकमतचे अभिनंदनही केले होते.