अन् एक-एक चक्कर येऊन कोसळत होता...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:50 AM2021-02-05T06:50:58+5:302021-02-05T06:50:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : मध्यरात्री बारा वाजता यात्री निवासच्या रूममध्ये आलो अन् त्यानंतर आम्हाला ‘त्याने’च सोबत आणलेले जेवण ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : मध्यरात्री बारा वाजता यात्री निवासच्या रूममध्ये आलो अन् त्यानंतर आम्हाला ‘त्याने’च सोबत आणलेले जेवण दिले. त्यानंतर अर्ध्या तासातच आम्हाला उटल्या होऊ लागल्या. पण त्या लुटारूने बाहेरून दरवाजा बंद केल्याने आम्हाला बाहेर पडता आले नाही आणि एक-एक जण चक्कर येऊन कोसळत होता, अशी माहिती शुद्धीवर आलेल्या सखुबाई पिराजी सूर्यवंशी यांनी पोलिसांना दिली.
त्या म्हणाल्या, आम्हाला ज्याने आणले, त्याच लुटारूने हाॅटेलमधून सोबत आणलेली चपाती, दोडक्याची भाजी, पिठलं खायला दिलं. त्यानंतरच सर्वजण बेशुद्ध झालोे. दुसऱ्या दिवशीच जाग आली, त्यावेळी सर्वांच्या अंगावरील दागिने लुटल्याचे लक्षात आले. सखुबाईने जेवणातील फक्त चपाती खाल्ली, तर इतर भाजी तिने आपल्याकडील खाल्ल्याचे सांगितले. त्यामुळे तिच्यावर इतरांइतका परिणाम झाला नाही. सर्वजण बेशुद्ध व गुंगीच्या अवस्थेत असल्याने नेमका किती रकमेचा ऐवज लुटला, याची ठोस माहिती रात्री उशिरापर्यंत पोलिसांना मिळाली नाही.
खात्यावरील ‘एंट्री’ तपासणार
कार्यक्रम निश्चितीसाठी आराधी ग्रुपला लुटारूने अडीच हजार रुपये ॲडव्हान्स दिला, ते पैसे लुटारूने सखुबाई सूर्यवंशी हिच्या हरिदास सूर्यवंशी या मुलाच्या बँक खात्यावर पाठविले होते. ते बँक खाते तपासून संशयिताचा माग काढणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
खरे दागिने लुटले, खोटे ठेवले
लुटारूने सर्व महिलांच्या अंगावरील सोन्याचे खरे दागिने तपासून ते लुटले, खोटे दागिने तसेच ठेवून पोबारा केल्याचे दिसून आले.
लुटारूने पुन्हा येऊन दागिने लुटले
सर्वजण जेवल्यानंतर संंबंधित लुटारू रूमला कुलूप लावून बाहेर गेला, त्याचवेळी सर्वांना आतच उलट्या झाल्या, सर्वजण बेशुद्ध पडले. त्यानंतर पुन्हा येऊन लुटारूने बेशुद्ध पडलेल्यांच्या अंगावरील दागिने व रोकड लंपास करून पहाटे पोबारा केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.