बेळगाव जिल्ह्यात अंगणवाडी सहाय्यीकेचा खून, मुलाचे दोन्ही डोळे फोडले, एक निकामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 04:09 PM2018-12-25T16:09:23+5:302018-12-25T16:11:10+5:30
बेळगाव जिल्ह्यात गुंडेनहट्टी येथे डोकीत वार करून अंगणवाडी सहाय्यीकेचा खून करण्यात आल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. जयश्री कल्लाप्पा बेळगावकर (वय ४०) असे या महिलेचे नाव असून या घटनेत तिचा आठ वर्षाचा मुलगा अनुराग हा देखील गंभीर जखमी झाला आहे. त्याचे दोन्ही डोळे फोडले असून त्यातील एक कायमस्वरूपी निकामी झाला आहे. प्रथमदर्शनी हा खून कौटूंबीक वादातून झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
खानापूर: बेळगाव जिल्ह्यात गुंडेनहट्टी येथे डोकीत वार करून अंगणवाडी सहाय्यीकेचा खून करण्यात आल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. जयश्री कल्लाप्पा बेळगावकर (वय ४०) असे या महिलेचे नाव असून या घटनेत तिचा आठ वर्षाचा मुलगा अनुराग हा देखील गंभीर जखमी झाला आहे. त्याचे दोन्ही डोळे फोडले असून त्यातील एक कायमस्वरूपी निकामी झाला आहे. प्रथमदर्शनी हा खून कौटूंबीक वादातून झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
बैलूर येथील कल्लाप्पा बेळगावकर यांच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर जयश्री दहा वर्षांपासून गुंडेहट्टी येथे माहेरीच राहत होत्या. त्या अंगणवाडीत सहाय्यीका म्हणून काम करीत उदरनिर्वाह चालवित होत्या. दहा दिवसांपूर्वी त्यांचे वडील आणि भावाशी वाद झाल्याने त्यांनी शेतवडीतील एका घरात आश्रय घेतला होता.
गावापासून जवळच असणाऱ्या या घरात त्या मुलासह राहत होत्या. अज्ञातांनी त्यांच्यावर नांगराच्या फाळाने वार करून त्यांची हत्या केली. यावेळी मारेकऱ्यांना विरोध करणारा त्यांचा मुलगा अनुराग याच्याही कपाळावर वार करण्यात आल्याने त्याचा एक डोळा कायमस्वरूपी निकामी झाला आहे.
मारेकऱ्यांनी कौले काढून घरात प्रवेश केला आणि त्यानंतर त्यांनी जयश्री यांच्यासह त्यांच्या मुलावर हल्ला केला. त्यात जयश्री या जागीच ठार झाल्या. अनुराग हादेखील ठार झाला असावा असे समजून मारेकरी निघून गेले. पण, तो सुदैवाने या घटनेत बचावला.
सकाळी शेतमालक नेहमीप्रमाणे गुरांचे दुध काढण्यासाठी आला असता त्याला मागील दार उघडे असल्याचे दिसले. त्यांनी जयश्री यांना हाका मारल्या, मात्र त्यांनी प्रतिसाद न दिल्याने आत जाऊन पाहिले असता त्या रक्तांच्या थारोळ्या पडल्याचे दिसले. जखमी अनुराग एका कोपऱ्यात कण्हत पडला होता. या घटनेची माहिती शेतीमालकांने गावकऱ्यांना दिल्यानंतर ही घटना उघडकीस आली.
पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. तसेच जखमी अनुराग याला बेळगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याचे कपाळ आणि दोन्ही डोळ्यांना गंभीर दुखापत झाली आहे. त्याचा एक डोळा कायमस्वरूपी निकामी झाल्याचे सांगण्यात येत आहे. जयश्री यांचे कुणाशीही वैर नव्हते. त्यामुळे त्यांची हत्या कुणी केली? याबाबत उलटसुलट चर्चा गुंडेनहट्टी परिसरात सुरू होती.
नंदगड पोलिस स्थानकात घटनेची नोंद झाली असून पोलिस निरीक्षक मोतीलाल पवार आणि नंदगडच्या उपनिरीक्षक सुमा नाईक अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, या प्रकरणाचा कसोशीने तपास करून मारेकऱ्यांना तात्काळ जेरबंद करण्याची मागणी अंगणवाडी वर्कर्स युनियनने तहशिलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.