अंगणवाडी भरती गुणवत्तेवरच!

By admin | Published: September 17, 2014 11:11 PM2014-09-17T23:11:12+5:302014-09-17T23:49:08+5:30

शासनाचा निर्णय : मुलाखतीचा फार्स झाला रद्द; थेट नियुक्तीचा मार्ग मोकळा

Anganwadi recruitment quality! | अंगणवाडी भरती गुणवत्तेवरच!

अंगणवाडी भरती गुणवत्तेवरच!

Next

विश्वास पाटील- कोल्हापूर -राज्यातील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस भरती यापुढे शैक्षणिक गुणवत्तेवरच करण्याचा निर्णय महिला व बालविकास विभागाने घेतला आहे. त्यासाठी होणारा मुलाखतीचा फार्स आता रद्द केला आहे. त्यामुळे ज्या महिलेची शैक्षणिक गुणवत्ता जास्त असेल, त्यांनाच कोणत्याही वशिल्याशिवाय या पदावरील थेट नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यासंबंधीचा आदेश या विभागाचे प्रधान सचिव उज्ज्वल उके यांनी काढला आहे.
अंगणवाडी भरती करताना शैक्षणिक गुणवत्तेला ९० गुण होते व दहा गुण मुलाखतीसाठी होते. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समित्या होत्या. या समित्या स्थापन होण्यातही दिरंगाई होई. त्यामुळे भरतीत अडचणी येत असे. शिवाय शैक्षणिक गुणवत्ता चांगली असूनही मुलाखतीत एखाद्या उमेदवारास जास्त गुण दिले गेले तर तिचीच निवड होई, असे प्रकार अनेक ठिकाणी होत. त्यामुळे या प्रक्रियेबद्दल राज्यभरातून तक्रारी होत्या. त्याची दखल घेऊन शासनाने हा मुलाखतीचा फार्सच रद्द करण्याचा चांगला निर्णय घेतला आहे. राज्यात रयत शिक्षण संस्थेत सध्या या पद्धतीने नोकरभरती होते.
राज्यात ज्या ठिकाणी पदे रिक्त झाली अथवा नवीन मंजूर झाली आहेत, अशा ठिकाणी पदे भरताना लेखी परीक्षा घेतली जाऊ नये. त्यासंबंधीची जाहिरात देऊन पात्र उमेदवारांची यादी तयार करावी. त्यामध्ये शिक्षण, विधवा वा अनाथ, जात आदींसाठी त्यांच्या प्रमाणपत्रानुसार निश्चित गुण देऊन त्याची गुणवत्ता यादी नोटीस बोर्डावर लावण्यात येणार आहे. एकापेक्षा जास्त उमेदवारांना सारखेच गुण असल्यास ज्यांची शैक्षणिक अर्हता जास्त आहे, त्यांची निवड होईल. ती समान असल्यास ज्यांचे वय जास्त आहे, त्यांची निवड होईल व त्यातूनही समान गुणवत्ता आल्यास उमेदवाराची निवड अखेर चिठ्ठी टाकून करण्यात यावी, असेही या आदेशात स्पष्ट केले आहे.
ही गुणवत्तायादी पाच दिवसांच्या आत जिल्हाधिकारी कार्यालय, पंचायत समिती अथवा बालविकास प्रकल्प कार्यालयाच्या नोटीस फलकावर लावण्यात येईल. त्यावर दहा दिवसांत तक्रार करता येऊ शकेल. उमेदवाराची निवड झाल्यास त्यांना तत्काळ नियुक्ती आदेश देऊन पुढील महिन्याच्या एक तारखेपासून कामावर रूजू करून घेण्यात येणार आहे. ज्या प्रकल्पांकडून यापूर्वीच्या शासन निर्णयाप्रमाणे (५ आॅगस्ट २०१० व १५ सप्टेंबर २०११) जाहिरात दिली आहे, त्यांनी जुन्याच आदेशानुसार निवड प्रक्रिया पूर्ण करावी व १३ आॅगस्ट २०१४ नंतर मात्र भरती प्रक्रिया नव्या आदेशानुसार करण्यात येणार आहे.

राज्यातील दृष्टिक्षेप
एकूण अंगणवाड्या :
८८ हजार २७२
शून्य ते सहा वर्षांखालील मुलांची संख्या : १ कोटी ३१ लाख ८७ हजार (२००१ची जनगणना)
अंगणवाड्यांत येणाऱ्या मुलांची संख्या : ८६ लाख ३१ हजार

Web Title: Anganwadi recruitment quality!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.