अंगणवाडी सेविका, मदतनिसांना तंदुरुस्त दाखला द्या, सीपीआरच्या सुप्रिया देशमुख धारेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 04:30 PM2019-01-28T16:30:28+5:302019-01-28T16:32:23+5:30
कोल्हापूर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, मदतनिसांना एका दिवसात तंदुरुस्त दाखला द्यावा, या मागणीसाठी येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाच्या (सीपीआर) अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख यांना सोमवारी धारेवर धरले. या मागणीसाठी प्रशासन जाणीवपूर्वक त्रास देत असल्याचा आरोप अंगणवाडी मदतनीस, सेविकांनी देशमुख यांच्यासमोर केला.
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, मदतनिसांना एका दिवसात तंदुरुस्त दाखला द्यावा, या मागणीसाठी येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाच्या (सीपीआर) अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख यांना सोमवारी धारेवर धरले. या मागणीसाठी प्रशासन जाणीवपूर्वक त्रास देत असल्याचा आरोप अंगणवाडी मदतनीस, सेविकांनी देशमुख यांच्यासमोर केला.
अंगणवाडी सेविका, मदतनिसांना नोकरीत नेमणूक देताना त्यांची वयाची ६५ वर्षे किंवा शारीरिकदृष्ट्या सक्षम असेपर्यंत त्यांना नोकरीत ठेवण्याबाबत शासनाचे परिपत्रक आहे. तथापि, मध्यंतरी शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय ६५ वरून ६० केले; मात्र त्यानंतर ते पूर्ववत ६५ वर्षे केले. परंतु, ज्यांची ६० वर्षे पूर्ण झाली आहेत, त्यांना शारीरिक सक्षमतेचा दाखला हजर करण्याची अट घातली.
याबाबत गेल्या काही दिवसांपासून अंगणवाडी सेविका, मदतनीस सीपीआरमध्ये येतात; पण जाणीवपूर्वक त्रास देत चुकीच्या पद्धतीने तपासणी केली जात आहे. तसेच काही वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून ज्येष्ठ सेविकांना अपमानास्पद वागणूक दिली जात आहे. याप्रश्नी सोमवारी जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनचे आप्पा पाटील व जयश्री पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ सीपीआर जिल्हाशल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पीपाटील यांना भेटण्यासाठी गेले; परंतु केम्पीपाटील हे आजारी असल्याने ते रजेवर आहेत. त्यामुळे शिष्टमंडळाने डॉ. सुप्रिया देशमुख यांची भेट घेतली.
यावेळी आप्पा पाटील म्हणाले, अंगणवाडी सेविका, मदतनिसांची कोणतीही अडवणूक न करता तंदुरुस्त दाखला द्यावा. त्यासाठी शासनाने गुरुवार (दि. ३१) पर्यंत मुदत दिली आहे. त्यामुळे ते लवकरात लवकर मिळावे.
यावर डॉ. सुप्रिया देशमुख म्हणाल्या, सीपीआर हे वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाच्या अखत्यारित येते. मात्र, तंदुरुस्त दाखला देण्याचा अधिकार हा जिल्हाशल्यचिकित्सक यांच्याकडे आहे. अंगणवाडी सेविका, मदतनिसांना लवकर दाखला देऊ. शिष्टमंडळात शोभा भंडारे, सरिता कंदले, दिलशाद नदाफ, मालन पाटील, सुनंदा कुराडे, सुरेखा कोरे, मंगल गायकवाड, बेबी चुडाप्पा, शमा पठाण, आदींचा सहभाग होता.