अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मुंबईत मोर्चा; कोल्हापुरात रस्ता रोको
By समीर देशपांडे | Published: January 3, 2024 03:59 PM2024-01-03T15:59:53+5:302024-01-03T16:01:07+5:30
विविध मागण्यांसाठी ४ डिसेंबर पासून अंगणवाडी कर्मचारी संपावर
कोल्हापूर : आपल्या विविध मागण्यांसाठी एकीकडे मुंबईमध्ये मोर्चा काढणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या अन्य सहकारी महिलांनी आज, बुधवारी कोल्हापूर जिल्हा परिषदेसमोर आंदोलन केले. दुपारी या कर्मचाऱ्यांनी रस्त्यात ठिय्या मारल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. समाजवादी पक्षाचे नेते शिवाजीराव परुळेकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
मानधन वाढीपासून विविध मागण्यांसाठी ४ डिसेंबर पासून अंगणवाडी कर्मचारी संपावर गेल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व अंगणवाडीचे कामकाज ठप्प झाले आहे. नागपूर आणि मुंबई येथे झालेल्या अयशस्वी चर्चेनंतर पुन्हा एकदा बुधवारी मुंबईत मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार हजारो महिला कर्मचारी मंगळवारी मुंबईला रवाना झाल्या. याच दिवशी कोल्हापूर जिल्हा परिषदेसमोर जोरदार घोषणाबाजी येथे आंदोलन करण्यात आले.