अंगणवाडी सेविकांचा अधिकाऱ्यांच्या विरोधात बंडाचा झेंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:21 AM2021-01-04T04:21:55+5:302021-01-04T04:21:55+5:30
भुदरगड एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी व पर्यवेक्षिका यांनी लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप माहितीच्या अधिकारात माहिती मागवून ...
भुदरगड एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी व पर्यवेक्षिका यांनी लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप माहितीच्या अधिकारात माहिती मागवून उपलब्ध माहितीच्या आधारे प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष मच्छिंद्र मुगडे व रोहित इंदुलकर यांनी केला होता. त्यामुळे प्रकल्प अधिकारी व संबंधित पर्यवेक्षिका अडचणीत सापडल्याने वरिष्ठांकडून त्यांची चौकशी सुरू झाली आहे. बनावट कागदपत्रांसाठी अधिकाऱ्यांकडून अंगणवाडी सेविकांना वेठीस धरले जात आहे. त्यामुळे संतापलेल्या सेविकांनी एकत्र येऊन प्रकल्प अधिकारी नयना इंगोले व पर्यवेक्षिका यांच्याविरोधात बंड पुकारले असून बैठकीत निषेध व्यक्त केला आहे.
यावेळी तालुकाध्यक्ष दीपाली केणे यांनी सर्व अंगणवाडी सेविकांना माहिती देण्यास कोणतीही अडचण नाही. मात्र अंगणवाडी सेविकांना केवळ एकाच वेळी प्रवास भत्ता दिला आहे. आकार प्रशिक्षण भत्ता दिलेला नाही. कोरोना कालावधीत सर्व सेविकांनी अत्यंत प्रामाणिकपणे काम केले आहे. पर्यवेक्षिका भोसले यांनी आपल्या सोयीनुसार मासिक बैठका घेतल्या असून या लेखाजोख्याला अंगणवाडी सेविकांना जबाबदार धरू नये. प्रकल्प अधिकारी नयना इंगोले व पर्यवेक्षिका यांच्या भ्रष्ट कारभाराला अंगणवाडी सेविकांना जबाबदार धरू नये, अशा संतप्त भावना पुष्पांजली पाटील, रंजना मोेरे, कल्पना कलकुटकी, स्नेहलता शिंदे यांसह अनेक सेविकांनी व्यक्त केल्या. यावेळी जोरदार घोषणाबाजी करीत अंगणवाडी सेविकांनी निषेध व्यक्त केला.
या बैठकीला पुष्पांजली पाटील, रंजना मोरे, स्नेहलता शिंदे, आर्या कांबळे, नीता बोटे, आनंदी तानवडे, शुभांगी पाटील, गीता शिंदे, अलका हळदकर, राणी मेंगाणे, शीतल पाटील यांसह तालुक्यातील सुमारे दोनशेच्या वर अंगणवाडी सेविका, मदतनीस उपस्थित होत्या.