अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून बिंदू चौकात केंद्र सरकारचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2020 07:37 PM2020-07-03T19:37:16+5:302020-07-03T19:40:53+5:30
वर्षानुवर्षे संघर्ष करून मिळविलेले कामगार कायदे कोरोनाच्या परिस्थितीचा गैरफायदा घेत केंद्र सरकार बदलत आहे. कामगारांचे हक्क हिरावणाऱ्या केंद्रातील भाजप सरकारच्या या कृतीचा निषेध शुक्रवारी बिंदू चौकात निदर्शनाने करण्यात आला. ऑल इंडिया ट्रेड युनियनच्या नेतृत्वाखाली अंगणवाडी बालवाडी कर्मचारी संघटनेने निदर्शनात सहभाग घेतला.
कोल्हापूर : वर्षानुवर्षे संघर्ष करून मिळविलेले कामगार कायदे कोरोनाच्या परिस्थितीचा गैरफायदा घेत केंद्र सरकार बदलत आहे. कामगारांचे हक्क हिरावणाऱ्या केंद्रातील भाजप सरकारच्या या कृतीचा निषेध शुक्रवारी बिंदू चौकात निदर्शनाने करण्यात आला. ऑल इंडिया ट्रेड युनियनच्या नेतृत्वाखाली अंगणवाडी बालवाडी कर्मचारी संघटनेने निदर्शनात सहभाग घेतला.
संपूर्ण देशात कायदे बदलण्याचा धडाका केंद्र सरकारकडून सुरू आहे. पेट्रोल-डिझेल दरवाढीने जनता हैराण आहे; पण केंद्र सरकार बघ्याची भूमिका घेत असल्याच्या विरोधात शुक्रवारी डाव्या पक्षांकडून देशव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली होती.
कोल्हापुरात संघटनेचे राज्य सरचिटणीस नामदेव गावडे, चंद्रकांत यादव यांच्या नेतृत्वाखाली बिंदू चौकात सकाळी आंदोलन झाले. यावेळी केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. यात रघुनाथ कांबळे, सतीशचंद्र कांबळे, गिरीश फोंडे, शुभांगी पाटील, सुभाष गुरव, प्रशांत आंबी, इरशाद मुजावर यांनी सहभाग घेतला.
प्रोत्साहन भत्त्यासाठी आग्रह
कोविड योद्धा म्हणून लॉकडाऊनच्या पहिल्या दिवसापासून अंगणवाडी कर्मचारी आरोग्य विभागाला मदत करीत आहेत. सर्व्हे असू दे की औषध वाटप. प्रत्येक वेळी अंगणवाडी सेविका व मदतनीस काम करीत आहेत; पण त्यांना केवळ एकच महिन्याचा प्रोत्साहन भत्ता दिला आहे. पुढील महिन्यांचा भत्ता दिलेला नसल्याने त्यांच्यात नाराजी आहे. शुक्रवारी झालेल्या आंदोलनात या कर्मचाऱ्यांनी हा भत्ता देण्याची आग्रही मागणी केली.
आंदोलकांच्या मागण्या
- कामगार कायदे पूर्ववत करा, त्यांत बदल करू नये
- सार्वजनिक उद्योगांचे होणारे खासगीकरण थांबवावे.
- असंघटित कामगारांना कोविड प्रोत्साहन भत्ता द्यावा.