रणरणत्या उन्हात अंगणवाडी सेविकांचा कोल्हापुरात तावडे हॉटेल चौकात रास्ता रोको

By भीमगोंड देसाई | Published: January 23, 2024 03:51 PM2024-01-23T15:51:36+5:302024-01-23T15:52:48+5:30

१०० सेविकांना पोलिसांनी ताब्यात घेतले, उद्यापासून पालकमंत्र्यांसह सत्ताधाऱ्यांच्या घरासमोर आंदोलन

Anganwadi workers stop at Tawde Hotel Chowk in Kolhapur | रणरणत्या उन्हात अंगणवाडी सेविकांचा कोल्हापुरात तावडे हॉटेल चौकात रास्ता रोको

छाया-नसीर अत्तार

कोल्हापूर : अंगणवाडी सेविकांना दर महिना २६ हजार रुपये व मदतनीसांना २० हजार रूपये वेतन द्यावे, यासह विविध मागण्यांसाठी दीड महिन्यांहून अधिक काळ संप करूनही सरकार गंभीर नसल्याने मंगळवारी जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाच्या नेतृत्वाखाली येथील तावडे हॉटेल चौकात रस्ता रोको आंदोलन केले. रणरणत्या उन्हात सेविका मोठ्या संख्येने तब्बल एक तास रस्त्यावर ठिय्या मारल्याने राष्ट्रीय महामार्ग आणि गांधीनगरहून येणारी आणि जाणारी वाहतूक थांबली. 

महामार्गावरआंदोलन करण्यासाठी जाणाऱ्या सुमारे १०० सेविकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर आक्रमक सेविकांनी सरकार विरोधात घोषणाबाजी करीत चौकातील सर्व रस्ते रोखून त्यांनी रोखले. तासाभरानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करून रस्ता खुला केला.

दरम्यान, सरकार मागण्यांकडे दूर्लक्ष करीत असल्याने आज, बुधवारपासून पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार प्रकाश आबिटकर यांच्यासह सत्ताधारी लोकप्रतिनिधींच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्याची घोषणा, यावेळी संघाचे अतुल दिघे यांनी जाहीर केले.

महामार्ग रोको आंदोलनासाठी जिल्ह्यातील कानाकोपऱ्यांतून सेविका, मदतनीस सकाळी दहापासूनच तावडे हॉटेल चौकात येत राहिल्या. दुपारी बारा वाजता हायवे रोखण्यासाठी सेविका जावू लागल्या. त्यावेळी पोलिसांनी त्यांना मज्जाव केला. यामुळे आक्रमक सेविका, मदतनीसनी चौकात ठिय्या मारला. सर्व रस्ते बंद केल्याने वाहनांच्या लांब रांगा लागल्या. कडाक्याचे उन डोक्यावर झेलत त्यांनी रस्ता रोखला. पोलिसांनी थोडा बळाचा वापर करून रस्ता खुला केला. त्यानंतर आंदोलन स्थगित केले. आंदोलनात धोडींबा कुंभार, छाया तिप्पट यांच्यासह सेविका, मदतनीस मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

Web Title: Anganwadi workers stop at Tawde Hotel Chowk in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.