अंगणवाडी कर्मचाऱ्यांची कोल्हापूर जिल्हा परिषदेवर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 11:47 AM2019-01-16T11:47:35+5:302019-01-16T11:49:31+5:30
‘ एक रुपयाचा कडीपत्ता, सरकार झालंय बेपत्ता’ अशा घोषणा देत कोल्हापूर जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेसमोर आपला संताप व्यक्त केला. कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
कोल्हापूर : ‘ एक रुपयाचा कडीपत्ता, सरकार झालंय बेपत्ता’ अशा घोषणा देत कोल्हापूर जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेसमोर आपला संताप व्यक्त केला. कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
दुपारी साडेबारानंतर महावीर उद्यानाजवळून मोर्चाला सुरुवात झाली. ‘कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही’, ‘आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा’ अशा घोषणा देत अंगणवाडी सेविका, मदतनीस जिल्हा परिषदेवर मोर्चाने आल्या. यावेळी सर्वांनीच रस्त्यावर बसून घोषणा सुरू केल्याने, या ठिकाणी वाहतूक दुसरीकडून वळविण्यात आली.
या ठिकाणी कॉ. आप्पा पाटील, जयश्री पाटील, सरिता कंदले, अर्चना पाटील यांची यावेळी भाषणे झाली. मोर्चानंतर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवी शिवदास यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
आंदोलनामध्ये शिवाजीराव परुळेकर, बाळेश नाईक, अंजना शारबिद्रे, राजश्री बाबाणावर, सुरेखा गायकवाड, शांता कोरवी, वंदना साबळे यांच्यासह अंगणवाडी कर्मचारी मोठ्या संख्येने सामील झाल्या होत्या.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या
१ सर्व प्रकारच्या अनियमित कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करा.
२ अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचारी माना, मानधनाऐवजी वेतन द्या.
३ भाऊबीजेऐवजी बोनस द्या, सरकारी नोकर मानेपर्यंत १८ हजार किमान वेतन द्या.
४ भविष्य निर्वाह निधी, कामगार विमा योजना यांसारख्या सामाजिक सुरक्षा योजना लागू करा.
५ अंगणवाड्यांचे खाजगीकरण करू नका.
६ केंद्र सरकारने २0 सप्टेंबर २0१८ अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी जाहीर केलेली मानधनवाढ फरकासह ताबडतोब द्या.
७ सेवानिवृत्तीचे लाभ निवृत्तीदिवशीच द्या.
८ अंगणवाडींसाठी इमारती मंजूर करा.
९ टीएच आहार बंद करू, ताजा आहार देण्याची व्यवस्था करा.
१0 वर्षाला १५ दिवस भरपगारी आजारपणाची रजा द्या.