Kolhapur: अंगणवाडी सेविका विविध मागण्यांसाठी ४ डिसेंबरपासून संपावर जाणार

By पोपट केशव पवार | Published: November 18, 2023 04:20 PM2023-11-18T16:20:27+5:302023-11-18T16:21:19+5:30

कोल्हापूर : ‘कोण म्हणंतय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही’, ‘आवाज दो, हम सब एक है’, ‘कांदा म्हटला बटाट्याला, लाज ...

Anganwadi workers will go on strike from December 4 for various demands | Kolhapur: अंगणवाडी सेविका विविध मागण्यांसाठी ४ डिसेंबरपासून संपावर जाणार

Kolhapur: अंगणवाडी सेविका विविध मागण्यांसाठी ४ डिसेंबरपासून संपावर जाणार

कोल्हापूर : ‘कोण म्हणंतय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही’, ‘आवाज दो, हम सब एक है’, ‘कांदा म्हटला बटाट्याला, लाज नाही सरकारला’ अशा घोषणा देत कोल्हापुरातील अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी शनिवारी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला. आपल्या विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचारी ४ डिसेंबरपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. त्याची नोटीस जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या उममुख्य कार्यकारी अधिकारी शिल्पा पाटील यांच्याकडे देण्यात आली. 

महावीर गार्डनपासून या मोर्चाला सुरुवात झाली. यावेळी राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. अंगणवाडी सेविकांना दरमहा २६ हजार रुपये मानधन द्या, मदतनिसांना २० हजार रुपये मानधन सुरू करा, महागाई निर्देशांकाला जोडून सहा महिन्यांनी मानधनात वाढ करा, विमा योगदान मासिक निर्वाह भत्ता सेवा समाप्तीनंतर देण्याचा प्रस्ताव महिला व बालविकासमंत्र्यांनी मान्य केला आहे. तो नाेव्हेंबरअखेरपर्यंत तयार करून हिवाळी अधिवेशनात मंजूर करा, महानगरपालिका हद्दीत जागेचे निकष शिथिल करून अंगणवाड्यांसाठी ५ ते ८ हजार रुपये भाडे मंजूर करा, आहाराचा दर सर्वसाधारण बालकांसाठी १६, तर कुपोषित बालकांसाठी २४ रुपये करा, अशा मागण्या करण्यात आल्या होत्या; पण या मागण्यांकडे दुर्लक्ष केले आहे.
 
इतर विभागांतील कर्मचाऱ्यांना भरघोस व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना तुटपुंजी वाढ का? सरकार नेहमीच अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सावत्रपणाची वागणूक देत आहे. त्यामुळेच ४ डिसेंबरपासून बेमुदत संपावर जाणार असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. या मोर्चात दीड हजारांहून अधिक अंगणवाडी कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी युनियनचे आप्पा पाटील, जयश्री पाटील, सुनंदा कुराडे, सुरेखा कोरे, मंगल गायकवाड, शोभा भंडारे, शमा पठाण, सरिता कंदले, अनिता माने, अर्चना पाटील यांच्यासह अंगणवाडी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मासिक बैठकीवर बहिष्कार

संपाच्या आधी नोव्हेंबरमधील मासिक प्रगती अहवाल, मासिक बैठक व इतर कोणतीही माहिती देण्यावर बहिष्कार टाकणार असल्याचे युनियने सांगितले. कोल्हापूर जिल्ह्यात ५ हजार अंगणवाडी सेविका व मदतनीस आहेत.

Web Title: Anganwadi workers will go on strike from December 4 for various demands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.