खासगी रुग्णालयातील बिलांबाबत आरोग्य समितीमध्ये संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:17 AM2021-06-11T04:17:46+5:302021-06-11T04:17:46+5:30
कोल्हापूर : शहर आणि जिल्ह्यातील खासगी रुग्णालयात होणाऱ्या कोरोना रुग्णांवरील उपचारांच्या बिलांबाबत गुरुवारी जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीमध्ये संताप व्यक्त ...
कोल्हापूर : शहर आणि जिल्ह्यातील खासगी रुग्णालयात होणाऱ्या कोरोना रुग्णांवरील उपचारांच्या बिलांबाबत गुरुवारी जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीमध्ये संताप व्यक्त करण्यात आला. या बिलांची चौकशी होऊन अतिरिक्त बिल आकारणी करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. अध्यक्षस्थानी सभापती हंबीरराव पाटील होते.
सविता भाटले यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले कोल्हापूर शहरातील एका खासगी रुग्णालयात दोन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. परंतु तरीही १३ लाख रुपयांचे बिल आकारण्यात आले. याबाबत कारवाई करण्याची गरज आहे. पन्हाळा तालुक्यातील काही बोगस डॉक्टर कोरोनाबाबत अपप्रचार करत असल्याची तक्रार यावेळी करण्यात आली. त्यावर कारवाई करण्याच्या सूचना प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उषादेवी कुंभार यांनी दिल्या.
जिल्ह्यातील सध्या क्षयरोगाच्या चाचण्या कमी झाल्या आहेत. त्या देखील वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या. कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेतल्यानंतर किती जणांचा मृत्यू झाला, अशी विचारणा करत त्यांच्या कारणांचा अभ्यास करण्याची सूचना सभापती पाटील यांनी केली. यावेळी प्रकाश टोणपे, चेतन पाटील, पुष्पा आळतेकर, सुनीता रेडेकर यांनी चर्चेत सहभाग घेतला. जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. फारूक देसाई यांनी लसीकरणाबाबत माहिती दिली.