खोटी तक्रार -आलिशान कार चोरीचा बनाव आला अंगलट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 10:38 AM2021-02-11T10:38:32+5:302021-02-11T10:43:10+5:30
Car Thief Crimenews Police Kolhapur- उच्च शिक्षणासाठी पैशांची आवश्यकता असल्याने स्वत:ची फोक्सवॅगन पोलो ही आलिशान कार चोरीला गेल्याची खोटी तक्रार दिल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. त्यामुळे करवीर पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करत संबंधित कार जप्त केली आहे.
कोल्हापूर : उच्च शिक्षणासाठी पैशांची आवश्यकता असल्याने स्वत:ची फोक्सवॅगन पोलो ही आलिशान कार चोरीला गेल्याची खोटी तक्रार दिल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. त्यामुळे करवीर पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करत संबंधित कार जप्त केली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ओमकार अनिल सटाले (वय २७, रा. रेणुका नगर, पाचगाव, ता. करवीर) यांनी त्यांची फोक्सवॅगन पोलो ही आलिशान कार दिनांक ३० जानेवारी रोजी अज्ञाताने चोरुन नेल्याची तक्रार करवीर पोलीस ठाण्यात ३ फेब्रुवारी रोजी दिली. पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास केला केला, त्यामध्ये भलतेच उघडकीस आले.
यातील फिर्यादी ओंकार सटाले यांना नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फायनान्शिअल मॅनेजमेंट, पुणे येथे डिप्लोमा इन फायनान्शिअल मॅनेजमेंटचे शिक्षण घेण्यासाठी पैशांची आवश्यकता होती. त्यासाठी त्यांनी स्वत:ची आलिशान कार मेकळकी (ता. रायबाग, जि. बेळगाव, कर्नाटक) येथे नातेवाईकांच्या दारात उभी केली व संबधित कार चोरीला गेल्याची खोटी तक्रार करवीर पोलिसात दिल्याचे तपासात निष्पन्न झाले.
पोलिसांनी ही आलिशान कार जप्त करुन पुढील तपास सुरु केला आहे. ही कारवाई करवीर पोलीस स्थानकाचे निरीक्षक संदीप कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक विवेकानंद राळेभात, हेडकॉन्स्टेबल राजेश आडुळकर यांनी केली.