दलित हत्याकांडाचे संतप्त पडसाद --दलित संघटना आक्रमक

By admin | Published: November 3, 2014 09:35 PM2014-11-03T21:35:08+5:302014-11-03T23:24:29+5:30

समतावादी नागरिकांतर्फे निदर्शने,इचलकरंजीतही निवेदन. एक तास रोखून धरला

Angry Dalits of Dalit massacre - Dalit organization attacked | दलित हत्याकांडाचे संतप्त पडसाद --दलित संघटना आक्रमक

दलित हत्याकांडाचे संतप्त पडसाद --दलित संघटना आक्रमक

Next

कोल्हापूर : अहमदनगर जिल्ह्यातील जवखेड (ता. पाथर्डी) येथील तिहेरी हत्याकांडाचे कोल्हापूर जिल्ह्यात तीव्र पडसाद उमटत आहेत. आरोपींना तातडीने अटक करावी, या मागणीसाठी दलित संघटना आक्रमक झाल्या आहेत. या घटनेच्या निषेधार्थ
सोमवारी यड्राव येथे लाक्षणिक बंद करण्यात आला. कागलला पुणे-बंगलोर महामार्ग तब्बल एक तास रोखून धरला. तर गडहिंग्लज प्रांत कचेरीवर समतावादी नागरिकांतर्फे निदर्शने करण्यात आली. इचलकरंजीतही प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

यड्रावमध्ये कडकडीत बंद
यड्राव : जवखेड (ता. पाथर्डी) येथील जाधव कुटुंबीयांच्या तिहेरी हत्याकांडाच्या निषेधार्थ येथील दलित संघटनांच्यावतीने एकदिवसीय लाक्षणिक बंद करण्यात आला. यावेळी गावातील सर्व व्यवहार बंद होते. शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश पवार यांना दलित संघटनांच्यावतीने निवेदन देण्यात आले.
जवखेड खालसा येथे झालेले हत्याकांड समाजाला काळिमा फासणारे असून, अन्यायग्रस्तांना तत्काळ आर्थिक मदत द्यावी, समाजकंटकांना त्वरित अटक करावी; अन्यथा दहा दिवसानंतर आंदोलन तीव्र करणार असल्याचे निवेदन निरीक्षक पवार यांना देण्यात आले. यावेळी सरपंच सरदार सुतार, सत्येंद्रराजे नाईक-निंबाळकर, उपसरपंच शिवाजी दळवी उपस्थित होते.
तत्पूर्वी गावातून या घटनेच्या निषेधार्थ फेरी काढण्यात आली. गावातील सर्व व्यवहार बंद होते. डीपीआय, आरपीआय, अण्णा भाऊ साठे चर्मकार संघटना, भीम कायदा सामाजिक संघटना यांच्यासह सर्व समाजबांधवांनी यामध्ये सहभाग घेतला होता. याप्रसंगी रंगराव कांबळे, प्रल्हाद भोसले, सुरेश आदमाने, बाबूराव साने, राहुल पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली फेरी काढण्यात आली. (वार्ताहर)

इचलकरंजी येथे प्रांतांना निवेदन
इचलकरंजी : अहमदनगर जिल्ह्यातील जवखेड खालसा येथील तिहेरी हत्याकांडातील आरोपींना तत्काळ अटक करावी आणि त्यांना फाशी द्यावी, अशा आशयाचे एक निवेदन रिपब्लिकन पार्टी-खोब्रागडे गटाच्यावतीने आज, सोमवारी येथील प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे यांना देण्यात आले.
जवखेड येथे माणुसकीला काळिमा फासणारी झालेली ही घटना होऊन बारा दिवस झाले तरी आरोपींना अटक होत नाही. याचा निषेध व्यक्त करून या निवेदनामध्ये उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर संघटनेचे तालुका अध्यक्ष रमेश कांबळे, विठ्ठल जावळे, प्रदीप कांबळे, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. (प्रतिनिधी)

कागलला महामार्ग रोखला
कागल : अहमदनगर जिल्ह्यातील जमखेड येथे झालेल्या दलित कुटुंबातील तिघांच्या हत्याकांडाचा त्वरित तपास करून फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आठवले गट)च्यावतीने जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांच्या नेतृत्त्वाखाली आज, सोमवारी येथील पुणे-बंगलोर महामार्ग तब्बल एक तास रोखून धरण्यात आला. तहसीलदार शांताराम सांगडे आंदोलनास्थळी आल्यानंतर त्यांना निवेदन देऊन हे आंदोलन थांबविण्यात आले.
बसस्थानक चौकात कार्यकर्ते एकत्र जमले. त्यानंतर घोषणा देत दुपारी १२.३०च्या सुमारास महामार्गावर आले. महामार्गावरील वाहतूक दोन्ही बाजूने रोखून धरली. पोलीस निरीक्षक निशिकांत भुजबळ, सहायक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे, रमेश सरवदे, आदींनी आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र, आंदोलकांनी शासन प्रतिनिधी म्हणून तहसीलदारांनी या ठिकाणी येऊन निवेदन स्वीकारावे आणि आमच्या भावना शासनापर्यंत पोहोचवाव्यात, असा पवित्रा घेतला आणि रस्त्यावर ठाण मांडले. एक तासभर वाहतूक थांबल्याने महामार्गावर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी बी. आर. कांबळे, बाबासाहेब कागलकर, विनोद कांबळे, आण्णासोा आवळे, सचिन मोहिते, साताप्पा मोहिते, साताप्पा हेगडे, गोरख कांबळे, तानाजी सोनाळकर, मंजुनाथ वराळे, तातोबा कांबळे उपस्थित होते. (प्रतिनिधी)

गडहिंग्लज प्रांत कचेरीवर समतावादी नागरिकांची निदर्शने
गडहिंग्लज : नगर जिल्ह्यातील जवखेड येथे दलित कुटुंबातील एकाच घरातील तिघांची निर्घृणपणे करण्यात आलेली हत्या मानवी प्रवृत्तीला काळिमा फासणारी असून, हत्याकांडातील आरोपींना तत्काळ अटक करून फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी समतावादी नागरिकांतर्फे करण्यात आली.
माजी आमदार ज्येष्ठ नेते अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे, माजी नगराध्यक्षा प्रा. स्वाती कोरी यांच्या नेतृत्वाखाली गडहिंग्लज येथील प्रांत कचेरीवर आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी समतावादी नागरिकांतर्फे निदर्शने करण्यात आली.
मुख्यमंत्र्यांच्या नावे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या हत्याकांडातील आरोपींच्या तपासासाठी खास पोलीस
पथक नेमून आरोपींना तत्काळ अटक करावी व फास्ट ट्रॅक कोर्टात
खटला चालवून दोषींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी अ‍ॅड. शिंदे, प्रा. कोरी, बापूसाहेब म्हेत्री यांची भाषणे झाली. दत्तात्रय मगदूम, भीमराव पाटील, पंचायत समिती सदस्य बाळेश नाईक, शशिकांत चोथे, नगरसेवक उदय परीट, परशुराम कांबळे, हरळीचे बाळकृष्ण परीट, अरुण पाटील, रजमान अत्तार, हारुण सय्यद, एम. एस. बोजगर, आदींसह समतवादी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)

कसबा सांगाव येथे ‘रास्ता रोको’
कसबा सांगाव : हसन मुश्रीफ युवा शक्तीच्यावतीने कसबा सांगाव (ता. कागल) येथे अहमदनगर जिल्ह्यातील जवखेड गावामध्ये दलित कुटुंबाच्या झालेल्या हत्येच्या निषेधार्थ रास्ता रोको करून निदर्शने करण्यात आली.
पुरोगामी महाराष्ट्राला काळिमा फासणाऱ्या या घटनेमधील मारेकऱ्यांना लवकरात लवकर अटक करून हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून फाशी देण्यात यावी, अशी मागणी या युवाशक्तीच्यावतीने प्रभारी पोलीस निरीक्षक रमेश सरवदे यांना निवेदने देऊन करण्यात आली.
मुख्य रस्त्यावरच रास्ता रोको करण्यात आल्याने दोन्ही बाजूंनी टॅ्रफिक जाम झाले होते. यावेळी रमेश सरवदे यांच्या नेतृत्वाखाली पो. उपनिरीक्षक दीपक वाघचौरे पो. उपनिरीक्षक सुनील कांबळे, प्रेमकुमार केदारे यांच्यासह पोलीस फौजफाटा मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला होता.
शाखा जिल्हाध्यक्ष संजय हेगडे, संतोष आवळे, विनोद घुले, किशोर घुले, शिवाजी आवळे, रामा आवळे, आकाश आवळे, अनिल चव्हाण, दौलत पाटोळे, दिगंबर हलगेकर,आदी उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Angry Dalits of Dalit massacre - Dalit organization attacked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.