संतप्त प्रवाशांनी नोकरदारांची रेल्वेगाडी रोखली -: कमी डब्यांची गाडी आल्याने प्रवासी संतापले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 12:59 AM2019-07-24T00:59:56+5:302019-07-24T01:01:09+5:30
‘नोकरदारांची गाडी’ म्हणून परिचित असलेली ही रेल्वेगाडी गेले सहा महिने अवेळी धावत असून, कधी बारा डब्यांची, तर कधी आठ व दहा डब्यांची येत असल्याने या गाडीस प्रचंड गर्दी होत आहे.
जयसिंगपूर / रुकडी : जयसिंगपूर आणि रुकडी येथे मंगळवारी सकाळी प्रवाशांनी रेल्वे रोखली. लोकल रेल्वेला डबे कमी असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. जवळपास पन्नास टक्के प्रवाशांना नव्या लोकल रेल्वेचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रेल्वे प्रशासनाकडे मागणी करुनही जादा डबे जोडले जात नसल्यामुळे प्रवाशांचा हा उद्रेक पाहायला मिळाला.
सातारा-कोल्हापूर (पॅसेंजर नं. ५१४४१) ही रेल्वे गाडी रुकडी येथे मंगळवारी सकाळी ९.४५ वाजता संतप्त प्रवाशांनी अडविली. ‘नोकरदारांची गाडी’ म्हणून परिचित असलेली ही रेल्वेगाडी गेले सहा महिने अवेळी धावत असून, कधी बारा डब्यांची, तर कधी आठ व दहा डब्यांची येत असल्याने या गाडीस प्रचंड गर्दी होत आहे.
या गर्दीमुळे प्रवाशाचे प्रचंड हाल होत आहेत. याबाबत वारंवार तक्रार करूनही रेल्वे प्रशासन यावर निर्णय घेत नव्हते. सोमवारी सकाळी याच गाडीमध्ये गांधीनगर ते जयसिंगपूर दरम्यान गर्दीमुळे एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याने व एक बालिका अत्यवस्थ झाल्याने प्रवासी संतप्त होते.त्यातच मंगळवारी सकाळची सातारा-कोल्हापूर पॅसेंजर गाडीही कमी डब्यांची आल्याने प्रवासी संतप्त झाले. गाडीत प्रचंड गर्दी असल्याने अनेक स्थानकांवर प्रवाशांना गाडीत चढता आले नाही. त्यामुळे प्रवाशांच्यात संतप्त भावना निर्माण झाली. रुकडी येथे तर संतप्त प्रवाशांनी रेल्वे ट्रॅकवरच थांबून ट्रॅक अडविल्यामुळे रेल्वेगाडी स्थानकापासून अर्धा किलोमीटरवर थांबविण्यात आली.
याठिकाणी प्रवाशांना हटविण्याकरिता रेल्वे पोलिसांची कुमक मागविण्यात आली होती. प्रवाशांची समजूत काढण्याकरिता रेल्वेचे अधिकारी गेले असता प्रवाशांनी त्याना धारेवर धरत आक्रमक प्रश्न विचारले. यामुळे त्यांनी तेथून काढता पाय घेतला.
रुकडी येथे रेल्वेगाडी पंधरा मिनिटे रेल्वेस्थानकाबाहेर उभी राहताच स्टेशन मॅनेजरांचा गोंधळ उडाला. त्यानी रेल्वे प्रशासनाला या गोष्टीची माहिती देताच गाडी स्थानकाच्या आत घेण्याच्या सूचना मिळाल्या. रेल्वे ट्रॅकवर प्रवासी थांबलेल्या ठिकाणी डेप्युटी स्टेशन मॅनेजर पंकजकुमार चौधरी यांनी जाऊन प्रवाशांची समजूत काढली. त्यांनी दोन दिवसांत या गाडीला जादा डबे जोडण्याची विनंती रेल्वे प्रशासनाला करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
यानंतर ट्रॅकवरून प्रवासी बाजूला झाले. तत्पूर्वी सकाळी मिरजहून कोल्हापूरकडे जाणाऱ्या या रेल्वेत प्रवाशांना बसण्यासाठी जागा नसल्याने व रेल्वेला फक्त सहाच डबे असल्याने संतप्त झालेल्या प्रवाशांनी जयसिंगपूर येथे थेट रेल्वे इंजिनसमोर उभा राहून निदर्शने सुरू केली. जवळपास पंधरा मिनिटे रेल्वे थांबविण्यात आली होती. त्यानंतर मोठा गोंधळ सुरू झाला. यावेळी रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठ प्रशासनाकडे मागणी कळविण्याचे आश्वासन दिल्यानंतर रेल्वे सोडण्यात आली.