'सुमंगल'साठी खर्च, कारवाईसाठी शासन सतर्क?; प्रशासनाविरोधात संताप
By समीर देशपांडे | Published: January 18, 2024 04:14 PM2024-01-18T16:14:27+5:302024-01-18T16:14:48+5:30
ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामसेवकांच्या संतप्त भावना
समीर देशपांडे
कोल्हापूर : गोकुळ शिरगावचे ग्रामविकास अधिकारी मुजीब शेख यांचे झालेले निलंबन, अस्लम नबीसो जमादार आणि अजय वाघ यांची होणारी चौकशी असो. एकूणच या प्रकाराविरोधात ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामसेवकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. शासनाच्या विविध कार्यक्रमांवेळी आम्हाला वरिष्ठ अधिकारी खर्च करायला लावतात आणि तपासणीत त्रुटी आढळल्या की कारवाई कशी करता, असा सवाल आता विचारला जात आहे.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या पथकाने गोकुळ शिरगावच्या ग्रामपंचायतीची तपासणी केली होती. त्यामध्ये अनेक त्रुटी आढळल्या. सुमारे ७०० बिलांचे बेकायदेशीरपणे ५० लाख रुपये रोखीने अदा केल्याचा ठपका ठेवण्यात आला. याच कारणावरून आधीच्या दोन्ही ग्रामविकास अधिकाऱ्यांचीही चौकशीही होणार आहे. परंतु यातील अधिकाधिक खर्च हा कणेरी मठावर आयोजित ‘सुमंगल महोत्सवा’वेळचा असल्याने त्यावेळी काहीही करा; परंतु ही कामे झाली पाहिजे, असे सांगणारे वरिष्ठ अधिकारी आता आमची बाजू का घेत नाहीत, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
कणेरी मठावरील महोत्सवावेळी मठावर जाण्यासाठी गोकुळ शिरगावमधूनच प्रमुख रस्ता जातो. या ठिकाणी स्वागत कमानी करण्यापासून माहिती कक्ष उभारण्यापर्यंत अनेक सोयीसुविधा उभारण्यात आल्या होत्या. या सगळ्याचा खर्च याच ग्रामपंचायतीमधून करण्यात आला आहे. त्यावेळी केंद्र आणि राज्य पातळीवरून मंत्री आणि अधिकारी येत होते आणि सूचना देत होते. सोयीसुविधा करायला लावत होते. जिल्हा परिषदेचे अधिकारीही हे उद्याच्या उद्या झाले पाहिजे अशा सूचना देत हाेते.
तर 'हे' ग्रामसेवकही निलंबित
कंदलगावला राज्यपाल येणार म्हणून २२ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला. या कार्यक्रमासाठी तातडीने मंडप उभारण्यापासून अनेक गोष्टी करण्यात आल्या. अतिशय कमी वेळात या व्यवस्था उभारायच्या असल्याने साहजिकच अशावेळी रोख पैसे दिल्याशिवाय कोणीही सेवा द्यायला येत नाही. त्यामुळे रोखीने खर्च केला जातो. हीच परिस्थिती शिंगणापूर येथील आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार या येऊन गेल्या. तिथेही मोठा खर्च झाला. या दोन्ही ठिकाणी आता तपासणी केली तर तिथले ग्रामसेवकही निलंबित करावे लागतील. जे अधिकारी उद्याच्या उद्या काम झाले पाहिजे म्हणतात तेही जबाबदारी का घेत नाहीत, अशी विचारणा होत आहे.