सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सोमवार पासून होणार प्राणी गणना; वन्यप्रेमींना संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2022 02:22 PM2022-05-15T14:22:46+5:302022-05-15T14:23:32+5:30

पाणवठ्यावरील मचाणावर बसुन होणार प्राण्यांची गणना, निसर्ग व वन्यजीव प्रेमींना संधी

Animal count at Sahyadri Tiger Reserve from Monday; Opportunity for wildlife lovers | सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सोमवार पासून होणार प्राणी गणना; वन्यप्रेमींना संधी

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सोमवार पासून होणार प्राणी गणना; वन्यप्रेमींना संधी

googlenewsNext

अनिल पाटील 

सरुड : - निसर्ग अनुभव कार्यक्रम २०२२ अंतर्गत सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सोमवार (ता.१६) रोजी बुद्ध पौर्णिमेच्या रात्री अभयारण्यातील पाणवठ्यावरील वन्य प्राणी गणना होणार आहे. निसर्गप्रेमी स्वंय सेवकांच्या मदतीने ही प्राणी गणना केली जाणार आहे . 

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघ, गवा, बिबटे, साळींदर, रानडुक्कर , हनुमान वानर ,पिसोरी, अस्वल, रानकुत्रे, सांबर ,चौसिंगा , भारतीय ससा आदी प्राणी आढळतात.  या प्राण्यांबरोबरच सह्याद्रीत पक्ष्यांच्या अनेक प्रजातींचा अधिवास  आढळून येतो .पश्चिम घाटात आढळणाऱ्या पाचशे पक्षांच्या प्रजाती पैकी सुमारे  २७५ प्रजातींचा  अधिवास येथे आहे .महाधनेश, समुद्री गरुड, कापशी घार ,गिधाड, पारवा, निलगिरी ,खवलेदार होला ,पाचू ,कवडा, पिवळ्या पायाची हरोळी ,राखी रान कोंबडा, भारतीय करवानक आदी पक्षांचे आजही या अभयारण्यात वास्तव्य आहे . 

दरवर्षी बुद्ध पोर्णिमेच्या रात्रीस अभयारण्यातील प्राण्यांची गणना केली जाते . परंतु  कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्ष मे महिन्यात होणारी ही प्राणी गणना करता आली नाही . यावर्षी निसर्गप्रेमीना सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलातील पाणवठ्यावरील प्राण्यांची गणना करता येणार आहे. सोमवारी रात्री  बुद्ध पौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात वन्य प्राण्यांची गणना करण्याचा निर्णय वन्यजीव विभागाने घेतला आहे.उन्हाळ्यामध्ये अभयारण्यातील बहुतांश पानवठे कोरडे  असतात त्यामुळे काही ठराविक पाणवठ्यावरच पाणीसाठा उपलब्ध असल्याने वन्य प्राणी  या पाणवठ्यावर पाणी पिण्यासाठी गर्दी करतात. अशा  पाणवठ्यावर लाकडी मचान बांधण्यात आली आहेत . त्यामुळे बुद्ध पौर्णिमेच्या चंद्राच्या लख्ख प्रकाशात या मचाणावरून वन्य प्राण्यांचे स्पष्ट दर्शन होऊ शकते. 

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात चांदोली राष्ट्रीय उद्यान व कोयना अभयारण्याचा समावेश होतो .चांदोली राष्ट्रीय उद्यान अंतर्गत चांदोली हेळवाक , ढेबेवाडी या परीक्षेत्राचा समावेश आहे.तर  कोयना वन्यजीव अभयारण्यात  कोयना व बामनोली या परीक्षेत्रांचा समावेश होतो. दोन्ही संरक्षित क्षेत्रात मिळून एकूण ५० मचाण उपलब्ध करून निसर्गप्रेमींच्या मदतीने प्राणी गणना करण्यात येणार आहे - एन. एस. लडकत.  क्षेत्र संचालक सह्याद्री व्याघ्र प्रकल्प    

प्राणी गणनेनंतर प्राण्यांची संख्या निश्चीत होणार

या प्राणी गणनेसाठी प्रत्येक मचाणावर एक वनकर्मचारी व दोन स्वयंसेवक अशी तिघांची नियुक्ती करण्यात आली आहे . त्यांच्यामार्फत सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील प्राणी गणना होणार आहे . १७ तारखेला सकाळी १० वा . या प्राणी गणनेचा समारोप होणार आहे . त्यानंतर या गणनेतील सर्व माहिती एकत्रित करून प्राण्यांची संख्या निश्चित केली जाणार आहे. अशी माहीती सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक उत्तम सावंत व चांदोली अभयारण्याचे  वनक्षेत्रपाल नंदकुमार नलवडे यांनी दिली .

Web Title: Animal count at Sahyadri Tiger Reserve from Monday; Opportunity for wildlife lovers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.