शासनाचा पोषक आहार ठरतोय जनावरांचे खाद्य
By admin | Published: September 8, 2015 12:51 AM2015-09-08T00:51:42+5:302015-09-08T00:51:42+5:30
खाद्यात कोंडा, गारा सापडल्या : निकृष्ट दर्जामुळे पालक घालतात जनावरांना
प्रकाश पाटील - कोपार्डे -महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतून किशोरवयीन मुली, कुपोषित बालक, गरोदर महिलांना योग्य प्रमाणात पोषक आहार मिळावा म्हणून दर महिन्याला सूक्ष्म पोषकतत्त्व मिश्रित आहाराचे वाटप केले जाते. मात्र, हा आहार एवढा निकृष्ट दर्जाचा आहे की, तो पालक मुलांना देण्यापेक्षा जनावरांच्या खाद्याताच घालणे पसंत करीत असल्याची धक्कादायक स्थिती आहे.
आघाडी शासनाने महिला सशक्तीकरणातून सुदृढ पिढी हा उद्देश समोर ठेवून किशोरवयीन मुली, गरोदर महिला, कुपोषित मुले यांच्यासाठी सूक्ष्मपोषक तत्त्वांनी युक्त आहार देण्याची योजना सुरू केली. ही योजना राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाकडून सुरू आहे. दर महिन्याला हा आहार अंगणवाडीच्या माध्यमातून ठेकेदार मुली, गरोदर महिलांना पुरविला जातो. सर्वसाधारण एक महिन्यासाठी एक किलो ९८0 ग्रॅम आहार द्यावा, अशी सूचना आहे. हा आहार पोषकतत्त्व मिश्रित असल्याचे यात नमूद करून तो तयार करतात. केवळ थोडेसे गरम पाणी मिसळल्यास हे खाण्यास तयार होतो, अशा सूचना आहेत.
हा आहार देताना एका लाभार्थी किशोरवयीन मुलीला प्रतिदिन गहू ७८ गॅ्रम, सोयाचंक किंवा वडी १२ ग्रॅम, चणा ३0 गॅ्रम, गूळ ४५ गॅ्रम, असे १६५ ग्रॅम आहार, तर कॅलरिज ६00 ग्र्रॅम, प्रथिने १५ ते २0 ग्रॅम यामध्ये मिश्रण असल्याचे पाकिटावर नमूद करण्यात आले आहे.
मात्र, हा आहार वरून पाकिटे चकाचक असल्याने चांगला असावा असे वाटते. मात्र, पाकीट उघडल्यानंतर त्यावेळी न भरडलेला गहू त्याचबरोबर खडे, गारा व मोठ्या प्रमाणात गव्हाचा कोंडाच असल्याचे दिसते. तो खाल्ल्याने अत्यंत निकृष्ट व बेचव असा आहार असल्याने सुदृढ होण्यापेक्षा दवाखान्यात अॅडमिट होण्याची वेळ येईल, अशी संतप्त प्रतिक्रिया पालक वर्गातून व्यक्त होत आहे.
वाकरे येथील माजी सरपंचानी याबाबत आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका व डॉक्टर यांच्याकडे या निकृष्ट आहाराबाबत विचारले असता निकृष्ट आहार असल्याच्या पालकांच्या तक्रारी असल्याचे सांगितले. पण, बंद पाकिटातून आलेला हा आहार तपासून पाहिल्यास तो निकृष्ट असल्याचेही दिसत असले तरी आमच्या हातात काही नाही, असे सांगत जबाबदारी झटकली.
मिळतोय तर घ्या व जनावरांना घाला
ग्रामीण भागात देण्यात येणारा किशोरवयीन
मुली, गरोदर महिला, कुपोषित मुले यांना मिळणारा आहार अत्यंत निष्कृष्ट दर्जाचा असल्याने पालक तो मुलींना देतच नाहीत; पण अंगणवाडीच्या माध्यमातून घरपोच केला जातो. मग मिळतोय तर घ्या, खायचा नाही; पण जनावरांच्या खाद्यात तरी मिसळता येईल, अशा प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहेत.
माझ्या मुलीसाठी मिळालेल्या आहाराचे पाकीट फोडले, तर त्यामध्ये कोंड्यांचेच प्रमाण जास्त आहे. गारा व न भरडलेले गव्हाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. हा आहार सकस कसा म्हणायचा. एक वेळ पाकिटावर असलेल्या कृतीप्रमाणे मुलीला तो करून खायला दिला, तर तिला उलट्या झाल्या. - जयश्री तोरस्कर (पालक, वाकरे, ता. करवीर)
प्रथम आहाराची पाकिटे फोडल्यानंतर हे पशुखाद्य आहे की काय, अशी शंका येते. कोंडा, खर, गारा असलेला आहार जर खाल्ला, तर आरोग्य बिघडल्याशिवाय
राहणार नाही
- अरुणा पाटील (लाभार्थी, कोपार्डे, ता. करवीर)