पशुसंवर्धन विभाग उपेक्षितच, डॉक्टरांच्या ६५ जागा रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:19 AM2020-12-25T04:19:42+5:302020-12-25T04:19:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : भारत हा कृषीप्रधान देश आहे असे वर्षानुवर्षे सांगितले जात असले तरी शेतकऱ्यांच्या जीवनाचा अविभाज्य ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : भारत हा कृषीप्रधान देश आहे असे वर्षानुवर्षे सांगितले जात असले तरी शेतकऱ्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक असलेल्या पशुसंपत्तीच्या जोपासनेकडे कोणत्याच राजकीय पक्षाचे लक्ष नसल्याचे स्पष्ट होत आहे. सध्या कोल्हापूर जिल्ह्यात पशुधन विकास अधिकारी वर्ग १ च्या ६५ जणांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे उपलब्ध डॉक्टरांवर मोठा ताण पडत आहे.
कोल्हापूर जिल्हा पशुधन आणि दुग्धउत्पादनातील अग्रेसर जिल्हा आहे. दरडोई शेतीचे क्षेत्र कमी असल्याने येथील शेतकरी उपजीविकेसाठी जनावरांचे पालन करतो. अनेकांचे संसार चालविण्यासाठी गायी, म्हशींच्या दूध उत्पादनाचे मोठे पाठबळ आहे. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाकडील मंजूर पदे भरण्याची गरज आहे. मात्र, दोन्ही काँग्रेस असो किंवा भाजप शिवसेना असो या विभागाकडे दुर्लक्षच होत आले आहे.
जनावरांचे लसीकरण, त्यांच्या आरोग्याचे प्रश्न, १०२५ ग्रामपंचायती आणि प्रत्यक्षात १२०० हून अधिक गावे आणि वाड्यावस्त्या आहेत. त्यामुळे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जागा मोठ्या प्रमाणावर रिक्त असल्यामुळे शेतकऱ्यांना सुलभ सुविधा मिळण्यास अडचण निर्माण होते ही वस्तुस्थिती आहे. यातील आजरा, चंदगड, भुदरगड, पन्हाळा, राधानगरी, शाहूवाडी या डोंगराळ तालुक्यांमध्ये तर ही अडचण जास्तच जाणवते.
जिल्ह्यातील गोकुळ आणि वारणा या अग्रगण्य दूध संघांनी जनावरांच्या देखभालीची आपल्या कार्यक्षेत्रातील जबाबदार चांगल्या पध्दतीने सांभाळल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या पशुवैद्यकीय विभागाचे अपयश फारसे दिसून येत नाही. परंतु हे सहकारी संघ आहेत म्हणून शासनाने या जागा रिक्त ठेवणे योग्य नाही.
चौकट
अ. न. संवर्ग रिक्त पदे
१ पशुधन विकास अधिकारी वर्ग १ ६५
२ सहा. पशुधन विकास अधिकारी वर्ग ०३
३ पशुधन पर्यवेक्षक १५
४ वरणोपचारक ११
एकूण ९०
जिल्ह्यातील पशुधन
गायी २७५११३
म्हशी ६१२९९८
मेंढ्या १०४१३०
शेळ्या १६२६०३
डुकरे ४५९३
घोडे १८१५
गाढवे १७०
उंट २३
कोंबड्या ६६०५३५
एकूण १८,२१,८८०