Kolhapur: ‘लम्पी’चा गायींना ताप, पशुपालकांना फुटला घाम; लसीकरण तरीही धोका

By राजाराम लोंढे | Published: September 2, 2024 01:23 PM2024-09-02T13:23:33+5:302024-09-02T13:24:05+5:30

मागच्या लाटेत १२८० जनावरे दगावली

animals are again affected by lumpy disease In Kolhapur district Concerns among pastoralists | Kolhapur: ‘लम्पी’चा गायींना ताप, पशुपालकांना फुटला घाम; लसीकरण तरीही धोका

Kolhapur: ‘लम्पी’चा गायींना ताप, पशुपालकांना फुटला घाम; लसीकरण तरीही धोका

राजाराम लोंढे

कोल्हापूर : जिल्ह्यात ‘लम्पी‘ आजाराने पुन्हा डोके वर काढण्यास सुरुवात केली असून, शिरोळ तालुक्यातील ‘कोथळी’, ‘उमळवाड’ येथील जनावरे बाधित झाली आहेत. एक जनावर दगावले आहे. दीड वर्षापूर्वी आलेल्या लाटेत तब्बल १२८० जनावरे मृत्युमुखी पडल्याने ‘लम्पी’चा ताप गायींना आला असला तरी घाम मात्र पशुपालकांना फुटला आहे.

गायवर्गीय गाय, बैल, वासराला ‘लम्पी’ची लागण होते. म्हशींच्या तुलनेत गायवर्गीय प्राण्यात रोगप्रतिकारशक्ती कमी असल्याने लागण लवकर होते. हा चर्मरोग असला तरी संसर्गाने झपाट्याने पसरतो. महाराष्ट्रात सप्टेंबर २०२२ पासून लम्पीची लागण झाली आणि वर्षभर शेतकऱ्यांचे गोठे मोकळे झाले.

वर्षभरात हातकणंगले, शिरोळ, करवीर, राधानगरी, भुदरगड, कागल, पन्हाळा तालुक्यातील ५० हजारांपेक्षा अधिक जनावरांना त्याची लागण झाली, त्यातील १२८० जनावरे दगावली होती. या कालावधीत राज्य शासन व ‘गोकुळ’ने प्रतिबंधक लसीकरण केले. सर्व जनावरांना लसीकरण केले तरी काही जनावरांना नव्याने लागण झाली. याचा फटका दूध उत्पादनावरही झाला होता.
आता ‘लम्पी’ने नव्याने डोके वर काढले असून शिरोळ तालुक्यातील दोन गावात १७ जनावरे बाधित झाली आहेत. आता ‘लम्पी’ने नव्याने डोके वर काढल्याने शेतकरी धास्तावला आहे.

ही आहेत लम्पीची लक्षणे..

लम्पी त्वचारोगाच्या लक्षणांमध्ये ताप, डोळे आणि नाकातून स्त्राव, जास्त लाळ, पशूंच्या शरीरावर फोड येणे आणि दुधाचे उत्पादन कमी होणे अशी लक्षणे दिसून येतात. काही प्रकरणांमध्ये गुरांना खाण्यास त्रास होतो.

लसीकरण तरीही धोका

पशुसंवर्धन विभागाने दीड वर्षापूर्वी गायवर्गीय सर्व जनावरांचे लसीकरण केले. ‘गोकुळ’ दूध संघाच्या मदतीने तब्बल २ लाख ८३ हजार ६३७ जनावरांना लस दिली, तरीही लम्पीचा धोका निर्माण झाला आहे.

पहिल्या लाटेत जिल्ह्यात अशी मिळाली मदत :

जनावर मृत्यू मदत
गाय  - ७७९ २.३३ कोटी
बैल - ३१६ ७८.७५ लाख
वासरु - १९३ २०.६६ लाख
एकूण  - १२८० ३.३२ कोटी

अशी मिळते आर्थिक मदत :
गाय : ३० हजार
बैल : २५ हजार
वासरु : १६ हजार

जिल्ह्यात शंभर टक्के लसीकरण झाले आहे, पण शिरोळ तालुक्यात काही जनावरांना बाधा झालेली आहे. बाधित जनावराला चांगल्या जनावरापासून अलगीकरणात ठेवावे. प्राथमिक लक्षणे दिसताच स्थानिक पशुसंवर्धन दवाखान्यात उपचार करून घ्यावेत. - डॉ. एम. ए. शेजाळ (प्रभारी पशुसंवर्धन उपायुक्त, कोल्हापूर)

Web Title: animals are again affected by lumpy disease In Kolhapur district Concerns among pastoralists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.