अंजनाबार्इंचा मृत्यू हत्तीच्या धक्क्यानेच!
By admin | Published: January 4, 2015 10:50 PM2015-01-04T22:50:05+5:302015-01-05T00:34:26+5:30
घट्टे यांची माहिती : पोलिसांकडून घटनेचा सखोल तपास सुरू
उंब्रज : पाल (ता. कऱ्हाड) येथील खंडोबा यात्रेत महिलेचा झालेला मृत्यू चेंगराचेंगरीमुळे झाला नसून, हत्तीचा धक्का लागूनच झाल्याची माहिती कऱ्हाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी मितेश घट्टे यांनी दिली. जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस यंत्रणा या घटनेचा सखोल तपास करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.
पाल येथील यात्रेत शनिवारी अंजना नामदेव कांबळे (वय ६५, रा. कदमवाडी लेबर चाळ, कोल्हापूर) या महिलेचा मृत्यू झाला होता. या घटनेच्या तपासातून निष्पन्न झालेल्या माहितीनुसार, देवस्थानचा हत्ती नदीपात्रात आल्यानंतर नवस पूर्ण करण्यासाठी भाविकांनी हत्तीवर लोकर उधळली. ही लोकर सोंडेत गेल्यामुळे हत्ती बिथरला. यावेळी संबंधित महिलेला हत्तीचा धक्का लागून तिचा मृत्यू झाला. घटनेवेळी या ठिकाणी जास्त गर्दीही नव्हती.
प्रशासनाने यापूर्वी घेतलेल्या कठोर निर्णयामुळे नदीपात्रात असणारी दुकाने गेल्या काही वर्षांपासून बंद करण्यात आली आहेत. ही दुकाने बंद केली नसती तर शनिवारी मोठी दुर्घटना घडली असती. यात्रेसाठी पोलीस प्रशासनाचे ३४ अधिकारी आणि ४०० कर्मचारी उपस्थित होते. या घटनेची नोंद उंब्रज पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू अशी झाली आहे. (वार्ताहर)
हत्ती ‘तंदुरुस्त’
यात्रा सुरू होण्यापूर्वी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी हत्तीची पूर्ण तपासणी केली होती. त्यांनी परवानगी दिल्यानंतरच यात्रेच्या मिरवणुकीत हत्तीचा समावेश करण्यात आला.
घटनास्थळावरून पोलिसांनी पोते भरून लोकर जप्त केली आहे.