साखर कारखान्यांसमोर ‘अंकुश’ आंदोलन
By admin | Published: February 28, 2017 12:28 AM2017-02-28T00:28:16+5:302017-02-28T00:28:16+5:30
५०० रुपयांची बाकी : शेतकऱ्यांना हक्काची रक्कम देण्याची आंदोलन अंकुशची मागणी
शिरोळ : चालू गळीत हंगामात तुटलेल्या उसाचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांना मिळावा, या मागणीसाठी आंदोलन अंकुशच्या वतीने सोमवारी शिरोळ व हातकणंगले तालुक्यांतील दत्त, गुरुदत्त, जवाहर व पंचगंगा साखर कारखान्यांसमोर एक दिवसाचे लाक्षणिक आंदोलन करण्यात आले. आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे यांच्या नेतृत्वाखाली दत्त, गुरुदत्त, जवाहर व पंचगंगा साखर कारखान्यांसमोर सोमवारी सकाळी दहा वाजता आंदोलनास प्रारंभ केला. बाजारात साखरेला उच्चांकी प्रतिटन ३७०० ते ३९०० रुपये दर मिळू लागला आहे. शासनाने १६ फेबु्रवारी २०१६ रोजी अधिसूचना काढून उसाचा दर कसा ठरवावा, याचे मापदंड घालून दिले आहेत. त्यानुसार कारखान्यांकडून शेतकऱ्यांना अद्याप प्रतिटन किमान ४५० ते ५०० रुपये येणे बाकी आहे, अशी आंदोलनकर्त्यांची मागणी आहे.
यापूर्वीही लेखी मागणी करून दुसरा हप्ता देण्याची मागणी केली होती. शिरोळ येथे आंदोलनात सुरेश भोसले, अवधूत काळे, अविनाश पाटील, बाळासाहेब सोमण, रघुनाथ पाटील, सुधाकर उदगावे, रामचंद्र सुतार, संजय मोडके, मारुती नंदिवाले कार्यकर्ते सहभागी झाले होते. गंगानगर येथील पंचगंगा साखर कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर धनाजी चुडमुंगे, कृष्णात गोटे, अवधूत काळे व राकेश जगदाळे यांनी धरणे आंदोलन केले. (प्रतिनिधी)
२० दिवसांची मुदत
उसाला दर कमी आणि साखर विक्रीतून कारखान्यांना जादा पैसे मिळाले असून, या पैशावर शेतकऱ्यांचा हक्क आहे. यासाठी आंदोलन अंकुशने आंदोलन केले. मागण्यांबाबत येत्या २० दिवसांत निर्णय न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती धनाजी चुडमुंगे यांनी दिली.