‘अंकुश’चे पदाधिकारी आले आत्मदहनासाठी

By admin | Published: April 30, 2015 11:03 PM2015-04-30T23:03:46+5:302015-05-01T00:17:31+5:30

प्रशासनास जाग : जि. प. बैठकीत सकारात्मक चर्चा

Ankush's office-bearer came to self-sacrifice | ‘अंकुश’चे पदाधिकारी आले आत्मदहनासाठी

‘अंकुश’चे पदाधिकारी आले आत्मदहनासाठी

Next

कोल्हापूर : वैयक्तिक लाभ देत असताना जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांची शिफारस शासन नियमांप्रमाणे घेणे बंधनकारक नाही. तरीही शिफारस घेऊनच हितसंबंधितांना लाभ दिला जात आहे. हे त्वरित बंद करावे, यासह विविध मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करीत ‘अंकुश’चे पदाधिकारी गुरुवारी दीडच्या सुमारास रॉकेलचे कॅन घेऊन जिल्हा परिषदेसमोर दाखल झाले. ही कुणकुण लागताच जिल्हा परिषद प्रशासन खडबडून जागे झाले.
सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांच्या दालनात त्वरित बैठक झाली. बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्यामुळे आत्मदहन आंदोलन स्थगित केले. वैयक्तिक लाभ देताना सदस्यांची शिफारस सक्तीची करणे बेकायदेशीर आहे. शिफारसींच्या माध्यमातून सदस्य बगलबच्च्यांची नावे घुसडतात. परिणामी, पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहतात. राजर्षी शाहू घरकुल योजनेंतर्गत जिल्हा परिषद सदस्य ज्यांना विहीत नमुन्यातील अर्ज देतात, त्यांनाच लाभ दिला जातो, हे पूर्णत: चुकीचे आहे. प्रशासनाने पारदर्शकपणे शासन नियमाप्रमाणे योजनेचा लाभ द्यावा. सदस्यांचा हस्तक्षेप टाळावा.
बांधकाम विभागाकडून झालेल्या कामांच्या ठिकाणी जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांच्या नावांचे लावलेले बेकायदेशीर फलक काढून टाकावेत, वारंवार पत्रव्यवहार करूनही समाज कल्याण विभागाने न दिलेले उत्तर मिळावे, जि. प.च्या मासिक बैठकीला बसण्यास परवानगी द्यावी, असे निवेदन यापूर्वी प्रशासनाकडे दिले होते. मात्र, प्रशासनाने दुर्लक्ष केले. त्यामुळे मागण्या २८ एप्रिलअखेर पूर्ण न केल्यास जि. प. इमारतीवरून उडी मारण्याचा इशारा दिला होता. सकाळी अकरापासूनच उडी मारल्यास त्यांना झेलण्यासाठी जाळी घेऊन पोलीस व अग्निशमन दलाचे जवान तैनात होते.
दरम्यान, ‘अकुंश’च्या आशाराणी पाटील, अभिजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते रॉकेलचे कॅन घेऊन जि. प.समोर आले. बंदोबस्त दिसताच अंतरावर दोन आंदोलक कॅन घेऊन थांबले. आशाराणी पाटील व अभिजित पाटील यांच्यासह शिष्टमंडळ बैठकीसाठी गेले. बैठकीत सकारात्मक चर्चा न झाल्यास आत्मदहन करावे, अशी सूचना दोन आंदोलकांना दिली. मात्र, सकारात्मक चर्चा झाल्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले. (प्रतिनिधी)


१४ मे रोजी बैठक
सर्व मागण्या पूर्ण करण्यासंबंधी
१४ मे रोजी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे आंदोलन मागे घेतले आहे. बैठकीत सर्व मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा आत्मदहन करणार असल्याचे आशाराणी पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

Web Title: Ankush's office-bearer came to self-sacrifice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.