आॅन दी स्पॉट रिपोर्टिंग: आंबेवाडी, चिखली गावे १०० टक्के पूरग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2019 11:18 AM2019-08-16T11:18:58+5:302019-08-16T11:24:01+5:30

न भूतो न भविष्यती अशा महाप्रलंयकारी महापुराचा १०० टक्के तडाखा बसलेल्या करवीर तालुक्यातील आंबेवाडी व चिखली या गावांची अवस्था दयनीय आहे. घरातील धनधान्य, जीवनावश्यक वस्तू कचऱ्यात रूपांतरित होऊन रस्त्यावर आल्या आहेत.

Ann the Spot Reporting: Ambewadi, Chikhali villages affected by 3% flood | आॅन दी स्पॉट रिपोर्टिंग: आंबेवाडी, चिखली गावे १०० टक्के पूरग्रस्त

आॅन दी स्पॉट रिपोर्टिंग: आंबेवाडी, चिखली गावे १०० टक्के पूरग्रस्त

Next
ठळक मुद्देआंबेवाडी, चिखली गावे १०० टक्के पूरग्रस्तमदतीसाठी टाहो अन् पळवापळवीही

नसिम सनदी

कोल्हापूर: न भूतो न भविष्यती अशा महाप्रलंयकारी महापुराचा १०० टक्के तडाखा बसलेल्या करवीर तालुक्यातील आंबेवाडी व चिखली या गावांची अवस्था दयनीय आहे. घरातील धनधान्य, जीवनावश्यक वस्तू कचऱ्यात रूपांतरित होऊन रस्त्यावर आल्या आहेत.

रस्ते कचऱ्याने माखल्याने चिखल आणि दुर्गंधीने आसमंत व्यापला आहे. ज्या पुराच्या पाण्याने एका झटक्यात रस्त्यावर आणले, तेच पाणी आता पिण्यासाठी मिळावे म्हणून गावकऱ्यांची धावाधाव सुरू आहे. मदतीचे ट्रक गावात येत आहेत; पण मदत मिळावी म्हणून एका बाजूला टाहो पसरला असताना दुसरीकडे मात्र पळवापळवीही जोरात सुरू आहे. यावरून गावात मारामाऱ्याही सुरू आहेत.

तब्बल नऊ दिवसांनंतर करवीर तालुक्यातील पंचगंगा नदीलगतच्या चिखली आणि आंबेवाडी गावांतील पूर ओसरला आणि डोळ्यांत अश्रूंचा पूर घेऊन गावकरी आपापल्या घरात परतले. दहा दिवसांपूर्वी भरलेले घर आणि गजबजलेले गाव आता कचरा कोंडाळ्यात रूपांतरित झाल्याचे पाहून अश्रूंना मोकळी वाट करून देतच ग्रामस्थांनी जगण्याची नवी लढाई सुरू केली.

आबालवृद्धांसह प्रत्येकजण घरातील घाण बाहेर काढण्यासाठी धडपडतानाचे चित्र या दोन्ही गावांत सर्वत्र दृष्टीस पडत होते. पडलेल्या घरातून उरलेले साहित्य बाहेर काढण्याचीही केविलवाणी धडपड सुरू होती. पुराच्या तडाख्यात शिल्लक राहिलेला थोडाफार संसार धुऊन आत घेण्यासाठी कुटुंबीयांची लगबग सुरू होती. हे सर्व सुरू असताना अचानक पळापळ सुरू होते.

कुणीतरी आरोळी ठोकतो टॅम्पो आला, ट्रक आला! मग हातातले काम सोडून सगळे पळू लागतात. अक्षरश: टेम्पोवर तुटून पडत मिळेल ते सामान ओढण्याची जणू स्पर्धाच लागल्याचे चित्र या दोन्ही गावांत रस्त्यांवर जागोजागी दृष्टीस पडत होते. यावरून गावात भांडणांनाही ऊत आला आहे. ही पळवापळवी पाहून मदत देणारेही हतबल झाल्याचे चित्र होते.

साठवलेले धान्य रस्त्यावर

वर्षभराची बेगमी म्हणून साठवून ठेवलेली धान्याची पोती भिजल्याने अक्षरश: रस्त्याकडेला फेकून देण्यात आली होती. या दोन्ही गावांमध्ये दरवर्षी पूर येत असल्याने एप्रिलमध्येच वर्षभर पुरेल इतके धान्य साठवून ठेवले जाते. हे ठेवताना १९८९ आणि २००५ च्या पूररेषेचा अंदाज धरून दहा फुटांवर ते ठेवले जाते. यावर्षीदेखील ते तसेच ठेवले गेले, पण सर्व अंदाज मोडीत काढत यावर्षी पूर दोन्ही वेळपेक्षा सात फुटांनी वाढला. परिणामी सर्व धान्य भिजून मोड आले आहेत. आता वर्षभर खायचे काय असा प्रश्न पडला आहे.

जनावरांना वैरण नाही

या गावातील रस्ते व गावठाण रिकामे झाले असले तरी अजूनही शेतवडीत पाणी साचले आहे. आठ दिवसांहून अधिक काळ ऊस पाण्याखाली राहिल्याने कुजण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे जनावरांचा ओल्या वैरणीचा प्रश्न गंभीर बनला आहे. एकट्या चिखली गावातील २५० जनावरे वाहून गेल्याने गोठे सुनेसुने झाले आहेत. गच्चीवर बांधलेली जनावरे आठ दिवस वैरण न मिळाल्याने अशक्त बनली आहेत, त्यांना तातडीने औषधोपचाराची गरज आहे.

आंबेवाडी

  • लोकसंख्या : २२0३
  • घरे : ५५७
  • कुटुंबे : ३१२
  • जमीन : १७५ हेक्टर
  • पडलेली घरे : ५0

 

चिखली

  • लोकसंख्या : ८५00
  • कुटुंबे : १२५0
  • जमीन : ८ हजार एकर
  • पडलेली घरे : २५0


भोसरी (ता. पुणे) येथून आमदार महेश लांडगे यांनी नगरसेवक दत्ता गव्हाणे यांच्या नेतृत्वाखाली ८0 ट्रक मदत पाठवली आहे. त्यापैकी एकट्या चिखली व आंबेवाडीत सहाहून अधिक ट्रक वाटप केले आहे; पण वाटप करताना गावकऱ्यांकडून होणारी पळवापळवी आणि भांडणे पाहून आपण व्यथित झालो आहोत, असा वाईट अनुभव कधी आला नाही, असे गव्हाणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

 

लोकवर्गणीतून रस्त्यासह इतर विकासकामे केल्याने चिखली हे गाव १९६८ साली देशात आदर्शवत ठरले होते. हेच गाव आता पूरबुडीत झाले आहे. सोनतळी येथे ३१ वर्षांपूर्वी प्रत्येकी एक गुंठा याप्रमाणे जागा दिली आहे; पण ती अपुरी व घरबांधणीची ऐपत नसल्याने हजार-बाराशे वगळता उर्वरितांचा मुक्काम गावातच आहे. पंचगंगेपासून रस्त्याच्या दुतर्फा टाकलेले भराव आणि बांधकामेच पुराला कारणीभूत असताना दोष मात्र आम्हाला का दिला जातोय.

-एस. आर. पाटील, 
माजी सदस्य, जिल्हा परिषद


पुराच्या पाण्यात आमचाजीव वाचला; पण आता खरे मरण सुरू झाले आहे. प्यायला पाणी नाही, वीज नाही, दारातील कचरा कोणी उचलत नाही, प्रचंड दुर्गंधी सुटली आहे.
- निलेश हंकारे, आंबेवाडी


आमच्या भागात कोणीही फिरकलेले नाही. पोटात अन्नाचा कण नाही, जेवणाचे पाकीट आले तर जेवायचे नाही तर तसेच घराची स्वच्छता सुरू ठेवायची असा दिनक्रम सुरू आहे. पैसे राहू देत; आम्हाला पोटभर प्यायला पाणी द्यावे.
दीपाली साळुंखे, आंबेवाडी


आमची शेती नाही, हातावरचे पोट आहे, डोक्यावर छप्पर होते, तेही आता पुराने हिरावून नेले. आम्ही चार कुटुंबे पूर्णपणे उघड्यावर आलो आहोत. आम्हाला कोणतीही मदत मिळत नाही. मदत देतानाही वशिलेबाजी होत आहे.
नामदेव कांबळे, चिखली


आमच्या गावाचे होत्याचे नव्हते झाले आहे. बाहेरून मोठ्या प्रमाणावर मदत येत आहे, पण त्याचे कोणतेही नियोजन नाही. मदत ग्रामपंचायतीत एकत्र करावी, असे आवाहन करूनही लोक ती परस्पर वाटत आहेत. यावरून गावाचीच बदनामी होत आहे.
अरुण माने, चिखली
 

 

Web Title: Ann the Spot Reporting: Ambewadi, Chikhali villages affected by 3% flood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.