अण्णा कलाकारांचे दिग्दर्शक--रमेश देव--अनंत माने जन्मशताब्दी विशेष
By Admin | Published: March 26, 2015 12:22 AM2015-03-26T00:22:08+5:302015-03-26T00:28:19+5:30
सवाल माझा ऐका आणि पिंजरा...- भालचंद्र कुलकर्णी
अण्णा कलाकारांचे दिग्दर्शक--रमेश देव
अनंत माने यांच्याकडील तब्बल आठ चित्रपटांत काम करण्याची संधी मला मिळाली, हे माझे भाग्य समजतो. हा माझ्यासारख्या कलाकारांचा सन्मान आहे. माझ्या आयुष्यात आलेल्या दोन दिग्दर्शकांमुळे मी घडलो. त्यातील पहिले म्हणजे राजा परांजपे आणि दुसरे अनंत माने. कलाकाराला दृश्य समजावून सांगताना ते त्यांच्या डोक्यात पक्के असायचे. रडण्याचे दृश्य समजावून सांगताना ते ढसाढसा रडायचे. आम्हाला मात्र ग्लिसरिन घालूनही रडू यायचे नाही. दुसरे म्हणजे कलाकाराच्या अडचणी ते समजावून घेत. मला तेव्हा हिंदीतही काम होते. मद्रासच्या एका चित्रपटाच्या तारखा त्यांच्या चित्रपटाबरोबर येत होत्या. माझी अडचण मी त्यांच्यापुढे मांडली. तेव्हा ते म्हणाले, ठीक आहे, मी माझे शूटिंग नंतर ठेवतो. त्या चित्रपटात मी नायक आणि जयश्रीबाई नायिका होत्या. मला त्यांनी आठ दिवसांची मोकळीक दिली. अनंत माने यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते चित्रपटाच्या कथेला फार महत्त्व देत. एखाद्या चित्रपटाची कथा ते कलाकारांना सेटवर बोलावून समजावून सांगत आणि त्यावर ते सर्वांचे मतही मागवत. मी अनेक दिग्दर्शकांकडे काम केले आहे. त्यात हिंदी, गुजराती, मद्रासी दिग्दर्शकांचा समावेश आहे; पण असा दिग्दर्शक मी पाहिला नाही.अनंत माने वेळ पाळण्याच्या बाबतीत अतिशय कडक. एकदा माझ्याकडून वेळ पाळली गेली नव्हती. सकाळी नऊ वाजताची शिफ्ट होती. मी दुपारी पोहोचलो. शालिनी सिनेटोनमध्ये तेव्हा शूटिंग सुरू होते. माझ्या शेतात काम करणाऱ्या एकाला साप चावला होता. त्याला डॉक्टरकडे नेऊन त्याचा जीव वाचविला होता. या गोंधळात मला वेळ झाला होता. शालिनीमध्ये तेव्हा फोन नव्हता. त्यामुळे ही माहिती कळविणे शक्य नव्हते. मी दुपारी पोहोचताच अनंत माने यांना सर्व प्रसंग समजावून सांगितल्यानंतर त्यांनी माझे शूटिंग रात्री नऊ वाजेपर्यंत पूर्ण केले. निर्मात्याचे नुकसान त्यांना मान्य नसायचे. अशी जाणीव असणारे दिग्दर्शक पुन्हा भेटले नाहीत.बहिणाबार्इंवर त्यांनी चित्रपट केला. त्यात माझ्यासह जयश्रीबाई, लीला चिटणीस, दादा साळवी यांच्या भूमिका होत्या. लावणी चित्रपट तर त्यांचा हातखंडा विषय होता. संगीताचेही त्यांना प्रचंड ज्ञान होते. अनंत माने हे परफेक्ट दिग्दर्शक होते.
- शब्दांकन : संदीप आडनाईक
सवाल माझा ऐका आणि पिंजरा...
चित्रपट कथेचा शोध घेताना अण्णा फक्त पुस्तकच वाचत नसत. ते चालतीबोलती माणसंही वाचत असत.
एकदा सायंकाळी अण्णा पाठीमागच्या गच्चीवर सहज सहकाऱ्यांशी गप्पा मारत बसले होते. समोरच्या रस्त्यावरून एक धडधाकट, उंचापुरा माणूस चालला होता आणि चक्क तो साडी नेसला होता! चौकशी करताना त्यांना कळलं की, तो एक मानाची पैजेची कुस्ती हरला होता आणि पैज अशी होती की, जो कुस्ती हरेल, त्यानं जन्मभर साडी नेसायची! अण्णांच्या डोक्यात विचारचक्र सुरू झालं आणि काहीतरी अचानक गवसल्याच्या आनंदात ते सहकाऱ्यांना
म्हणाले, ‘अरे, आपल्याला कथा सापडली. हा माणूस कुस्ती हरला. आपल्या कथेतला पुरुष तमाशात सवाल-जबाबात हरतो आणि पैज हीच - त्यानं जन्मभर साडी नेसायची आणि तिथं एका महोत्सवी चित्रपटाचा जन्म झाला, ‘सवाल माझा ऐका.’
ज्या चित्रपटानं अजरामर इतिहास निर्माण केला, लोकप्रियतेचे, उत्पन्नाचे सगळे उच्चांक ज्यानं मोडीत काढले, त्या पिंजरा चित्रपटाची ‘कथा’ ही अनंत मानेंचीच. कथेचा छोटासा धागा जरी अण्णांना मिळाला, तरी तेवढा त्यांना पुरेसा होई. त्यावरून अख्खा चित्रपट, कथानक कलात्मक रीतीनं तयार करत. ‘ब्लू एंजल’ या इंग्रजी चित्रपटाची कथा मुंबईत कुणीतरी अण्णांना ऐकवली. त्यांनी ‘ब्लू एंजल’ चित्रपट पाहिला की नाही ते मला ठाऊक नाही; पण कथा कळल्यावर तातडीनं त्यांचे गुरू शांतारामबापू (व्ही. शांताराम) यांच्याकडे गेले. शांतारामबापंूना ती इतकी आवडली की, शंकर पाटील, राम कदम, जगदीश खेबुडकर यांना पाचारण करून ‘पिंजरा’ तयार होऊ लागला. ‘पिंजरा’ची कथा, पटकथा तयार करून अण्णा थांबले नाहीत, तर ‘पिंजरा’च्या निर्मितीत ते शेवटपर्यंत शांतारामबापूंचे प्रमुख सहकारी होते. ‘पिंजरा’च्या कथेवर अण्णांनी खूपच अभ्यास केला होता. तसा तो व्ही. शांताराम यांनीही केला होताच. एका प्रसंगाबाबत मात्र दोघांमध्ये मतभेद झाले होते. त्यावेळी अण्णांनी शांतारामबापूंना दिग्दर्शक म्हणून तुमचे मत अखेरचे असे सांगून बैठक सोडली होती, परंतु दुसऱ्या दिवशी पुन्हा शांतारामबापूंनी अण्णांचा मुद्दा मान्य करून तसा प्रसंग चित्रित करण्याला मान्यता दिली. अशाप्रकारे या कथेवर बऱ्याच साधकबाधक चर्चा घडत होत्या. चित्रपटाच्या रौप्यमहोत्सवी समारंभात बापंूनी अण्णांचे भरभरून कौतुक केले आणि २५०० रुपयांचे खास पारितोषिकही दिले. ‘पिंजरा’च्या देदीप्यमान अभूतपूर्व यशात शांतारामबापूंच्या नवनवोन्मेषशाली प्रतिभेचा आविष्कार तर आहेच; पण त्याचबरोबर अण्णांचा सहभागही तितकाच मोठा आहे.
- भालचंद्र कुलकर्णी
अनंत माने तथा अण्णा मराठी चित्रपटसृष्टीचा जणू आधारवड !
२२ सप्टेंबरपासून त्यांच्या जन्मशताब्दी वर्षास प्रारंभ झाला आहे. त्यानिमित्त अण्णांच्या सहवासातील कलावंतांच्या काही मोजक्या आठवणी लोकमत जागविणार आहे.