जग बदल घालुनी घाव, ‘शाहिरी जागर’द्वारे अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 10:50 AM2019-08-03T10:50:40+5:302019-08-03T10:52:50+5:30
‘जग बदल घालुनी घाव,’ ‘एका धरतीच्या पोटी,’ ‘भीमसूर्याचा जाळ अण्णा भाऊ’, ‘या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे’, आदी पोवाड्यांतून ‘शाहिरी जागर’ कार्यक्रमाद्वारे शिवाजी विद्यापीठात शुक्रवारी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले.
कोल्हापूर : ‘जग बदल घालुनी घाव,’ ‘एका धरतीच्या पोटी,’ ‘भीमसूर्याचा जाळ अण्णा भाऊ’, ‘या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे’, आदी पोवाड्यांतून ‘शाहिरी जागर’ कार्यक्रमाद्वारे शिवाजी विद्यापीठात शुक्रवारी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले.
विद्यापीठाच्या अण्णा भाऊ साठे अध्यासनाच्या वतीने ‘शाहिरी जागर’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. वि. स. खांडेकर भाषाभवनमध्ये झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन विद्यापीठाच्या विदेशी भाषा विभागाच्या प्रमुख डॉ. मेघा पानसरे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी इंग्रजी अधिविभागाचे प्रमुख डॉ. अक्षय सरवदे, तर कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर प्रमुख उपस्थित होते.
शाहीर देवानंद माळी (सांगली), आझाद नायकवडी (कोल्हापूर), बाबूराव कांबळे (कांडगाव), संजय जाधव (इचलकरंजी), सदाशिव निकम (सिद्धनेर्ली) आणि नूपुर व राजवैष्णवी वायदंडे यांनी ‘शाहिरी जागर’ कार्यक्रमात एकाहून एक सरस असे पोवाडे सादर करून वातावरण भारावून टाकले. उपस्थितांमध्ये शाहीर राजू राऊत, शामराव खडके, विनायक चव्हाण, दिलीप सावंत असे शाहिरी परंपरा समृद्ध करणारे कलावंत होते. त्यामुळे या कार्यक्रमाला उत्तरोत्तर रंगत चढत गेली.
डॉ. नायकवडी यांनी शाहिरी मुजऱ्याने सुरवात करून ‘जग बदल घालुनी घाव’, ‘एका धरतीच्या पोटी’ हे पोवाडे सादर करून कार्यक्रमाचा दमदार प्रारंभ केला. त्यानंतर देवानंद माळी यांनी त्यांच्या नेहमीच्या जोशात ‘गण’ आणि अण्णा भाऊंना स्वरचित शाहिरी वंदना अर्पण केली. संजय जाधव यांनी ‘या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे’, ‘शिवारी चला’ सादर केले. सदाशिव निकम यांनी ‘भीमसूर्याचा जाळ अण्णा भाऊ,’ आदी सादर केले. दिवसभरात बाबूराव कांबळे, नूपुर आणि राजवैष्णवी वायदंडे यांनी अत्यंत जोशपूर्ण सादरीकरण केले. अध्यासनाचे प्रमुख तथा मराठी विभागप्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. नंदकुमार मोरे यांनी आभार मानले.
चिरंतन टिकून राहणारे साहित्य
साहित्याच्या सार्वकालिक निकषांवर लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य चिरंतन टिकून राहणारे आहे. या साहित्यातील विचारांनी महाराष्ट्राच्या वैशिष्ट्यांना जिवंत केले. त्यांनी प्रबोधनात्मक साहित्याची परंपरा निर्माण केली, असे प्रतिपादन डॉ. मेघा पानसरे यांनी येथे केले.