अण्णा भाऊ साठे जयंती विशेष: डॉ. आंबेडकरांची चळवळ अण्णा भाऊंच्या साहित्याची प्रेरणा
By संदीप आडनाईक | Published: August 1, 2023 05:43 PM2023-08-01T17:43:56+5:302023-08-01T17:44:40+5:30
‘श्रमिक प्रतिष्ठान’च्या पुस्तकातून माहिती प्रथमच उजेडात
कोल्हापूर : भारतातील साम्राज्यवादविरोधी राष्ट्रीय चळवळ आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ या ज्येष्ठ लेखक अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याच्या प्रेरणा असल्याचा संदर्भ शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागाचे अधिव्याख्याता आणि अण्णा भाऊ साठे अध्यासनाचे समन्वयक प्रा. रणधीर शिंदे आणि ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉ. अशोक चौसाळकर यांनी शोधला आहे. त्यांचे हे साहित्य श्रमिक प्रतिष्ठानने ‘युगांतर’मधील अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य या पुस्तकाद्वारे प्रकाशित केले आहे.
अण्णा भाऊ साठे हे कम्युनिस्ट पक्षाच्या ‘युगांतर’ या साप्ताहिकात १९५०-६१ या काळात सातत्याने लिखाण करीत होते. त्यांनी त्या साप्ताहिकात लिहिलेल्या निवडक साहित्याचा संग्रह या पुस्तकरूपाने प्रकाशित झाले आहेत. ‘हवे ते लिहितो’ या लेखमालेत अण्णा भाऊंनी आपल्या साहित्याच्या प्रेरणा व त्याचे प्रयोजन याचे विवेचन केले आहे, अशी माहिती प्रा. रणधीर शिंदे यांनी दिली. या पुस्तकात अण्णा भाऊ म्हणतात, मार्क्सवाद-लेनिनवाद, भारतातील साम्राज्यवादविरोधी राष्ट्रीय चळवळ व डॉ. आंबेडकरांची चळवळ या आपल्या साहित्यनिर्मितीच्या प्रेरणा होत्या.
या संग्रहातील त्यांच्या साहित्यातून महाराष्ट्रातील वारणा खोरे सर्व रस, रंग व गंध यासह प्रकट होते. त्यात मुंबईतील गरीब लोकांचा जगण्यासाठीचा संघर्ष व कामगारांचा लढाऊपणा दिसून येतो. त्यांच्या कविता वीररसाने ओथंबल्या आहेत. त्यांच्या दलित कथांचे वेगळेपण सर्वांचे लक्ष वेधणारे आहे. अण्णा भाऊंचे हे ‘युगांतर’मधील साहित्य त्यांच्या प्रतिभेचे नवदर्शन घडवून देते.
या पुस्तकाचे संपादन डॉ. अशोक चौसाळकर व डॉ. रणधीर शिंदे यांनी केले आहे. डॉ. चौसाळकर शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागातील निवृत्त प्राध्यापक आहेत तर प्रा. रणधीर शिंदे याच विद्यापीठाच्या मराठी विभागात अधिव्याख्याता आणि अण्णा भाऊ साठे अध्यासनाचे समन्वयक म्हणून कार्यरत आहेत.
प्रादेशिक भाषाशैलीत लेखन
मुंबईतील लालबाग, परळ, गिरणगाव, चिरागनगर आणि कोल्हापूर, सांगली परिसरातील वारणा खोऱ्यातील गावरान मराठी या दोन्ही प्रदेशांतील विशिष्ट भाषाशैली अण्णा भाऊंच्या साहित्याचे आणखी एक वैशिष्ट्य आहे.
‘युगांतर’ या साप्ताहिकामध्ये प्रसिद्ध झालेले हे लिखाण अण्णा भाऊंच्या साहित्याबद्दल नवी दृष्टी देणारे व यातील बहुतांश लेखन प्रथमत:च ग्रंथरूपाने प्रकाशित होत आहे. यातून वाचकांना अभ्यासकांना अण्णा भाऊंच्या लेखनाकडे पाहण्याची नवी दृष्टी प्राप्त होईल, असे वाटते. -डॉ. रणधीर शिंदे, समन्वयक, अण्णा भाऊ साठे अध्यासन, शिवाजी विद्यापीठ.