अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून मिळणार जामिनाविना कर्ज : पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2018 03:43 AM2018-09-30T03:43:00+5:302018-09-30T03:43:35+5:30
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहू सभागृहात आयोजित करण्यात आली होती. यावेळी महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार उपस्थित होते.
कोल्हापूर : अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या कर्जासाठी कर्जदाराचे व्याज व कर्जाचा पहिला हप्ता शासन भरणार आहे. त्याची हमी शासनाने घेतली असून, कर्जतारण किंवा जामीनदार ही अट रद्द केली आहे. यासाठी विमा संरक्षण मिळणार असल्याने बँकांनी तरुण-तरुणींना व्यवसायांसाठी त्वरित कर्ज उपलब्ध करून द्यावे, असे आदेश कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी येथे दिले.
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहू सभागृहात आयोजित करण्यात आली होती. यावेळी महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार उपस्थित होते. महामंडळाच्या कर्ज योजनेची माहिती लाभार्थ्यांपर्यंत जाण्यासाठी पुढील काळात तालुकास्तरांवर विविध शिबिरांचे आयोजन करण्यात यावे. तसेच जिल्ह्यामध्ये समुपदेशकांची पाच पदे कंत्राटी तत्त्वावर तातडीने भरण्यात यावीत. प्रोजेक्ट रिपोर्टसाठी स्थानिक चार्टर्ड अकाउंटंटची मदत घ्यावी. महामंडळाच्या कार्यालयामध्ये शिबिरे आयोजित करावीत, अशा सूचनाही मंत्री पाटील यांनी दिल्या.