अब्दुललाटमधील श्री दत्त मंदिरचे अध्यात्मिक तपस्वी अण्णा महाराज यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2022 05:55 PM2022-02-08T17:55:57+5:302022-02-08T18:09:24+5:30
वयाच्या विसाव्या वर्षापासून श्रीदत्तांचे भक्त म्हणून त्यांनी काम पाहिले
अब्दुललाट : येथील श्रीदत्त मंदिरचे अध्यात्मिक तपस्वी अण्णा सुबराव खोत उर्फ अण्णा महाराज (वय ९३) यांचे निधन झाले. गेली सात दशके ते अध्यात्मिक व धार्मिक क्षेत्रात किर्तन व प्रवचने करून भाविकांना आपलेसे केले होते. वयाच्या विसाव्या वर्षापासून श्रीदत्तांचे भक्त म्हणून त्यांनी काम पाहिले. अण्णा महाराज यांच्या निधनाचे वृत्त समजताच अब्दुललाट पंचक्रोशीत शोककळा पसरली.
सन १९६२ साली आपल्या घरीच श्रीदत्त मंदिर बांधले. त्यांना दत्तभक्तीचा लळा लागल्याने ते ब्रह्मचारी राहिले. त्यानंतर त्यांनी आपली हयात पूजा, अर्चा, अध्यात्मिक प्रवचने लोकांना देत राहिले. त्यांची साधी राहणी व उच्चविचारसरणी असल्यामुळे पंचक्रोशीत त्यांचा लौकिक वाढला. त्यांचे आशिर्वाद घेण्यासाठी पंचक्रोशीबरोबर कर्नाटकातील भक्त रोज येत असत.
मंगळवारी सकाळी त्यांच्या निधनाची वार्ता समजताच अंत्यदर्शन घेण्यासाठी जनसागर लोटला. अबालवृद्धापर्यंत लोक हुंदके देत होते. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा, असा जयघोष चालू होता. निधनादिवशी सूर्यास्तापूर्वी त्यांची श्री दत्तमंदिरासमोरच समाधी बांधली. यावेळी चैतन्यभारती महाराज (नरंदे) व गिरीलिंग मठाचे महाराज उपस्थित होते.
सर्व व्यवहार बंद
गावातील सर्व व्यवहार बंद करण्यात आले. त्यानंतर त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. अंत्ययात्रेत वारकरी संप्रदाय व महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. सजवलेल्या गाडीमध्ये त्यांचा देह बसविण्यात आला होता. त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. अंत्ययात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी कुरूंदवाड पोलिसांचे सहकार्य लाभले.