दहा वर्षांच्या मनस्वीने केली चौदा हजार फूट उंचीची अन्नपूर्णा मोहीम फत्ते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2019 02:40 PM2019-11-26T14:40:39+5:302019-11-26T14:42:09+5:30
त्यामध्ये विविध वयोगटांतील स्त्री-पुरुष सहभागी झाले, त्यातील मनस्वी ही सर्वांत लहान होती. एवढ्या लहान वयात ही मोहीम पूर्ण करणारी ती दक्षिण महाराष्ट्रातील पहिली मुलगी आहे.
कोल्हापूर : जगातील सर्वांत उंच शिखरांपैकी अन्नपूर्णा हे दहाव्या क्रमांकाचे शिखर, त्याच्या बेस कॅम्पची उंची १४ हजार फूट, उणे तापमान व खडतर प्रवास असूनही कोल्हापुरातील मनस्वी विश्वास पाटील (रा. पद्मावती कॉलनी, देवकर पाणंद) या दहा वर्षांच्या मुलीने अन्नपूर्णा बेस कॅम्प ही ट्रेकिंग मोहीम फत्ते केली. समिट अॅडव्हेंचरच्या पुढाकाराने झालेल्या या मोहिमेत महाराष्ट्रासह अमेरिका व इंग्लंडमधील बाराजणांची टीम सहभागी झाली होती. त्यामध्ये विविध वयोगटांतील स्त्री-पुरुष सहभागी झाले, त्यातील मनस्वी ही सर्वांत लहान होती. एवढ्या लहान वयात ही मोहीम पूर्ण करणारी ती दक्षिण महाराष्ट्रातील पहिली मुलगी आहे.
या मोहिमेचे नेतृत्व विनोद कांबोज यांनी केले. त्यामध्ये कोल्हापुरातून डॉ. सुहास कुलकर्णी, डॉ. किमया शहा, स्मिता नसलापुरे, अभय देशपांडे, औरंगाबादहून डॉ. संतोष कस्तुरे, अमेरिकेच्या सबरीना महाजन, अपराजित महाजन, प्रमोद ठाणेदार आणि इंग्लंडमधून आदिती कुलकर्णी हे सहभागी झाले. मनस्वी पाटील ही कोल्हापूर पब्लिक स्कूलमध्ये शिकते. ‘लोकमत’चे कोल्हापूर आवृत्तीप्रमुख विश्वास पाटील यांची ती कन्या आहे. ती सागर पाटील जलतरण तलावाची जलतरणपटू आहे. तिला बास्केटबॉलची आवड आहे. या छोट्या गिर्यारोहकामुळे साऱ्या टीमचा उत्साह द्विगुणित झाल्याची प्रतिक्रिया इतर सहभागी व्यक्तींनी व्यक्त केली.
आठ हजार मीटर उंचीच्या चौदा शिखरांपैकी चढाईसाठी कठीण समजले जाते ते अन्नपूर्णा शिखर. गिर्यारोहकांसाठी अशक्यप्राय असणारे शिखर जगभरातल्या ट्रेकर्ससाठी मात्र नंदनवन म्हणून ओळखले जाते. अन्नपूर्णा बेस कॅम्पची उंची १४,१०० फूट आहे. या ट्रेकवर दिवसातील ६ ते ७ तासच सूर्यप्रकाश असतो. या ट्रेकची सुरुवात होते ती नेपाळमधील पोखरा व्हॅलीमधून. पोखरा येथून बसने गॅन्डरुख येथे पोहोचून चालण्याची सुरुवात होते. गॅन्डरुख ते चोमरुंग, चोमरुंग ते बांबू, बांबू ते देवराली आणि देवरालीवरून मच्छपुच्छरे बेस कॅम्प पार करून अन्नपूर्णा बेस कॅम्प. या संपूर्ण ट्रेकमध्ये जे चढ-उतार आहेत, ते खूप दमछाक करणारे आहेत. कसलेला ट्रेकर्सही चालताना हतबल होतो तो या ट्रेकवर असणाºया पायऱ्यांमुळेच. हा चढ-उतारांचा त्रास सदाहरित जंगलामुळे फारसा जाणवत नाही.
उणे ६ तापमान
सूर्य मावळला तसा सर्व बेसकॅम्प चंद्राच्या शीतल प्रकाशात न्हावून निघाला. सर्वदूर पसरलेल्या बर्फावरून चंद्रप्रकाश परावर्तित होत होता आणि अन्नपूर्णा शिखरमालेतील मैलागणती प्रदेशही रात्र असूनही लख्खपणे नजरेत भरत होता. आता उत्सुकता होती ती पहाटेची; परंतु त्या रात्री तापमान होते उणे ६. इतक्या कमी तापमानात १४ हजार फूट उंचीवर झोपणे म्हणजे रात्र संपविणे एवढेच असते. संध्याकाळी मच्छपुच्छरेकडे असणारा चंद्र पहाटे अन्नपूर्णा साऊथजवळ येऊन पोहोचला होता आणि आकाशात मागे सूर्यकिरणांची लाली दिसण्यास सुरुवात झाली. सूर्योदय होत होता आणि थंडीचा कडाका वाढला होता. सकाळी ६ वाजता २६,५४५ फूट उंचीवर अन्नपूर्णा शिखरावर पहिली सोनेरी किरणे आली आणि तो महाकाय पर्वत हळूहळू सोनेरी होऊ लागला.