सहकारातील ज्येष्ठ नेते आण्णासाहेब चौगुले यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:19 AM2021-05-29T04:19:58+5:302021-05-29T04:19:58+5:30
त्यांनी राज्य,जिल्हा तसेच तालुका पातळीवरील अनेक सहकारी संस्थांत विविध पदे भूषविली. सुमारे ६५ वर्षांच्या राजकीय व सहकार क्षेत्रातील कामगिरीने ...
त्यांनी राज्य,जिल्हा तसेच तालुका पातळीवरील अनेक सहकारी संस्थांत विविध पदे भूषविली. सुमारे ६५ वर्षांच्या राजकीय व सहकार क्षेत्रातील कामगिरीने त्यांनी आपले कर्तृत्व लोकांच्या हितासाठी सिद्ध केले. दोन्ही क्षेत्रांत त्यांनी काटकसरीने,चिकाटीने,लोकांच्या फायद्यासाठी प्रभावी काम केले.
राजकारणाची सुरवात ग्रामपंचायत पासून १९५० साली केली. २० (वीस) वर्षे गावचे सरपंचपद भूषविले. स्वातंत्र्यसैनिक माजी आमदार दिनकरराव मुद्राळे यांना त्यांनी गुरू मानून आपली कारकीर्द सुरू केली. मुद्राळे यांच्या विचारांचा पगडा त्यांच्यावर होता. कोणताही वाद विवाद न करता सर्वांना सोबत घेत विधायक कामाला त्यांनी प्राधान्य दिले. गावात पंचायत समितीचे माजी सभापती सीताराम भंडारी यांच्या सोबतीने विकासाची कामे प्रचंड केली.
देशभक्त आमदार रत्नाप्पा कुंभार,सहकारमहर्षी शामराव पाटील(यड्रावकर),तात्यासाहेब कोरे यांच्या बरोबर त्यांनी सहकारात काम केले.जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून एक वर्ष तर तेरा वर्षे संचालक पद भूषिविले.हातकणंगले तालुका सेवा संस्था गटातुन त्यांनी विजय मिळविला होता.
विशेष म्हणजे त्यांनी हातकणंगले तालुका खरेदी विक्री संघाची धुरा अत्यन्त यशस्वी पणे सांभाळली. या संस्थेच्या प्रगतीमध्ये त्यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. ते शेतकरी सहकारी संघाचे विद्यमान संचालक होते. कोल्हापूर जिल्हा सुतगरिणी,वारणा सहकारी दूध संघ,पश्चिम महाराष्ट्र राज्य सहकारी संघ,पुणे तसेच राज्य सहकारी संघ या ठिकाणी संचालक म्हणून काम केले. हातकणंगले तालुका देखरेख संघाचे २० वर्षे अध्यक्ष होते.
एकाच वेळेला वीसहून अधिक ठिकाणी पदाधिकारी होण्याचा मान त्यांनी मिळविला होता.संयमी,नम्र,स्पष्ट बोलणारे असल्याने त्यांना आदरयुक्त दबदबा होता. संस्थांचाकारभार व्यवस्थित चालावा यासाठी ते आग्रही असत.
हातकणंगले तालुका खरेदी विकी संघाचे संचालक आप्पासाहेब चौगुले यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात दोन मुले,दोन मुली असा परिवार आहे. रक्षा विसर्जन शनिवारी (दि.२९) सकाळी आहे.