ऐन दिवाळीत सात घरे आगीत खाक
By admin | Published: November 12, 2015 12:22 AM2015-11-12T00:22:29+5:302015-11-12T00:24:44+5:30
गुंडगेवाडीतील घटना : ४७ लाखांचे नुकसान; नऊ कुटुंबे उघड्यावर
वारणावती : गुंडगेवाडी (ता. शिराळा) येथे मंगळवारी रात्री अचानक लागलेल्या आगीत सात घरे भस्मसात झाली. आगीत धान्य, प्रापंचिक साहित्य, रोख रक्कम, दागिने असे ४७ लाख चार हजारांचे नुकसान झाल्याने नऊ कुटुंबे उघड्यावर आली आहेत. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. ऐन दिवाळीत घडलेल्या दुर्घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.
शिराळा तालुक्याच्या पश्चिम विभागातील गुंडगेवाडी गावाची लोकसंख्या केवळ चारशेंवर आहे. मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास आनंदा शंकर गुंडगे यांच्या घराला अचानक आग लागली. जोराच्या वाऱ्यामुळे आगीने क्षणातच रौद्ररूप धारण केले. त्यामुळे शेजारच्या सात घरांनीही पेट घेतला. सर्व प्रापंचिक साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. येथील गणेश मित्रमंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थांनी कूपनलिकेचे पाणी तसेच मातीचा मारा करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. दोन तासांनंतर इस्लामपूर नगरपालिका व विश्वास साखर (पान १ वरून)
कारखान्याच्या अग्निशामक दलाच्या गाड्या दाखल झाल्या. पहाटे पाचच्या सुमारास आग आटोक्यात आली. निवृत्ती सावंत, सर्जेराव, रवींद्र गुंडगे, रामचंद्र गुंडगे, लक्ष्मण गुंडगे, बाळू गुंडगे, सुरेश गुंडगे या युवकांसह करुंगली, काशीदवाडी, चिंचेवाडी, खराळे, भाष्टेवाडी, आरळा, मराठेवाडी येथील युवकांनी धाडसाने सात घरांतील व्यक्तींना, जनावरांना सुरक्षितस्थळी हलविले. त्यामुळे जीवित हानी टळली. शिवाय लागून असलेल्या घरांचे वासे तोडून संपर्क तोडण्यात आला. यामुळे शेजारची घरे आगीपासून वाचली.
नुकसानग्रस्त कुटुंबे व नुकसानीची रक्कम : आनंदा शंकर गुंडगे (एक लाख रुपये), किसन बाळकू गुंडगे (आठ लाख ५0 हजार), रामचंद्र धनू गुंडगे (सात लाख ४५ हजार), शिवाजी तुकाराम गुंडगे (सात लाख ९५ हजार), मारुती तुकाराम गुंडगे (सात लाख ३२ हजार), शालन पांडुरंग गुंडगे (पाच लाख २२ हजार), मालन किसन गुंडगे (तीन लाख ३७ हजार), शालन विष्णू गुंडगे (चार लाख ७३ हजार), किसाबाई तातोबा गुंडगे (एक लाख ५0 हजार), असे एकूण ४७ लाख चार हजारांचे नुकसान झाले आहे. आगीत भस्मसात झालेल्या कुटुंबांपैक ी तीन कुटुंबप्रमुख या विधवा आहेत. त्यांना लहान मुले आहेत. त्यांचे आर्थिक उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही. कोरडवाहू शेतीवरच त्यांचा उदरनिर्वाह सुरू आहे. आगीमुळे या महिलांवर संकट कोसळले आहे. ऐन दिवाळीत घडलेल्या या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. घटनास्थळी कोकरूडचे पोलीस, गावकामगार तलाठी, मंडल अधिकारी, सरपंच,आदींनी भेट देऊन पंचनामा केला.
निराधार झालेल्या या कुटुंबांना मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शासनानेही या कुटुंबांना सावरण्याचा प्रयत्न करावा, अशी मागणी करण्यात येत आहे. (वार्ताहर)
सत्यजित देशमुख यांची तत्परता
गुंडगेवाडी येथील सात घरांना आग लागल्याची बातमी रात्री समजताच प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सत्यजित देशमुख यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली व ते आग विझविण्यामध्ये सहभागी झाले. आग आटोक्यात आल्यानंतर मध्यरात्री अडीचपर्यंत देशमुख घटनास्थळी तळ ठोकून होते. यावेळी जळीत कुटुंबांना ते आधार देत होते. त्यांना शासकीय मदत मिळवून देण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. वैयक्तिक स्वरूपात मदत देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.