ऐन दिवाळीत प्रवाशांचे हाल, कोल्हापुरात ‘लाल परी’ थांबली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 06:22 PM2017-10-17T18:22:57+5:302017-10-17T18:31:09+5:30
सातव्या वेतन आयोगाच्या मागणीसह अन्य प्रलंबित प्रश्नांसाठी महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी आयोग संयुक्त कृती समिती सोमवारी (दि. १६) मध्यरात्रीपासून राज्यभर संपात उतरली आहे. मंगळवारी दिवसभर ऐन दिवाळीत कोल्हापुरातील बारा आगारांत बसगाड्या थांबून राहिल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले; तर खासगी वाहनधारकांनी प्रवाशांकडून चढे दर घेऊन लूटमार सुरू केली.
कोल्हापूर , दि. १७ : सातव्या वेतन आयोगाच्या मागणीसह अन्य प्रलंबित प्रश्नांसाठी महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी आयोग संयुक्त कृती समिती सोमवारी (दि. १६) मध्यरात्रीपासून राज्यभर संपात उतरली आहे. मंगळवारी दिवसभर ऐन दिवाळीत कोल्हापुरातील बारा आगारांत बसगाड्या थांबून राहिल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले; तर खासगी वाहनधारकांनी प्रवाशांकडून चढे दर घेऊन लूटमार सुरू केली. एकंदरीतच एस.टी बसच्या संपामुळे ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे बिरूद मिरवणाऱ्या एस.टी.ने प्रवाशांचे चांगलेच हाल केले.
महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी आयोग संयुक्त कृती समितीने मंगळवारी मध्यरात्रीपासून संप पुकारल्याने राज्यातील सर्व मार्गांवरील एस. टी. बसच्या फेऱ्या रद्द केल्या. अनेकजणांना संप असल्याचे माहीत नसल्याने ते बसस्थानकांवरच अडकून पडले होते. मध्यवर्ती बसस्थानक येथे पुणे-मुंबई येथून कोकणाकडे जाणारे काही प्रवासी मध्यरात्रीपासून गाडीमध्येच बसून होते.
गाडी आता सुटेल, नंतर सुटेल असे वाटत असताना सुमारे तासाभरानंतर एस. टी. महामंडळाच्या वतीने गाड्या रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले. जो-तो प्रवासी मोबाईलवरून आपल्या घरी व नातेवाइकांना गाड्या रद्द झाल्या आहेत. घरी येण्यास वेळ लागेल, असे सांगत होता.
ऐन दिवाळीतील संपामुळे प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली. विशेषत: महिला आणि लहान मुलांना सांभाळून सणाच्या दिवशी घरी पोहोचण्यासाठी प्रवाशांना कसरत करावी लागली. दरम्यान, कोल्हापूरच्या एस. टी. स्थानकावर ‘बंद’च्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
खासगी वाहनधारकांकडून लूटमार
एस.टी. बंदचा सर्वांत जास्त फायदा खासगी वाहतूकदारांनी उचलला. ऐन दिवाळीत बसस्थानकात अडकलेल्या प्रवाशांना आपल्या गावी पोहोचण्यासाठी अनेकांनी दुप्पट-तिप्पट दर लावून प्रवाशांची लूटमार सुरू केली होती. इचलकरंजीचा एस.टी.चा तिकीट दर ३३ रुपये असताना खासगी वाहनधारक १०० रुपये घेत होते; तर निपाणीसाठी ५२ रुपये तिकीट दर असताना २०० ते २५० रुपये तिकीट दर आकारण्यात येत होता. पुणे-मुंबईच्या तिकीटदराबाबत तर मनमानीचाच कारभार या ठिकाणी पाहावयास मिळत होता. नाइलाजास्तव इतके चढे दर देऊन अनेकांनी प्रवास केला.
पाण्याच्या बाटल्यांची विक्री
बस आता सुरू होईल, मग सुरू होईल, या विचारात असलेल्या व सुमारे पाच ते सात तास ताटकळत बसलेल्या प्रवाशांना पाण्याची बाटली घेण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे पाणीविक्रेत्यांची या निमित्ताने दिवाळीच साजरी झाली.
रेल्वेगाड्या फुल्ल
मिरजेहून कोल्हापूरकडे येणाऱ्या व कोल्हापूरहून मिरजेकडे जाणाऱ्या सर्व रेल्वेगाड्या तुडुंब झाल्या होत्या. याचा फटका आरक्षण केलेल्या प्रवाशांना बसला.