रॅलीच्या माध्यमातून ‘रानमोडी’चे उच्चाटन
By Admin | Published: January 4, 2015 09:19 PM2015-01-04T21:19:46+5:302015-01-05T00:40:27+5:30
पन्हाळा तालुक्यात रॅली : निसर्गमित्र, राजाराम महाविद्यालयाचा उपक्रम
पोर्ले तर्फ ठाणे : निसर्गमित्र संघटना आणि राजाराम महाविद्यालयाच्या वतीने पन्हाळा पश्चिम भागात ‘निसर्गाकडे चला’ असा संदेश देत सायकल रॅली काढण्यात आली. रॅलीच्या माध्यमातून ‘रानमोडी’ तणाचे श्रमदानातून उच्चाटन करण्यात आले.
कोल्हापूर येथील शाहू मिल, मंगेशकरनगर, बेलबाग परिसरातील ‘रानमोडी’ तणाचे उच्चाटन करून रॅली सुरू झाली. रॅलीच्या दरम्यान येणाऱ्या गावातील शाळा, महाविद्यालये, ग्रामपंचायत, सार्वजनिक मंडळे, महिला बचत गट, शेतकरी, कष्टकरी यांच्यात ‘रानमोडी’ व पर्यावरण जागृतीविषयी कृतिशील प्रबोधन करण्यात आले. शेती आणि जंगलसंपदेवर अतिक्रमण करणाऱ्या तणांची माहिती देण्यात आली.
पर्यावरणपूरक जीवनशैली आचरणात आणण्याच्या दृष्टिकोनातून पाण्याचे महत्त्व, कचऱ्याचे विघटन, प्लास्टिकचा गैरवापर, विजेचा वापर कमी, सौरऊर्जेचा वापर, आदींविषयी ग्रामस्थांना विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन केले. तुकाराम महाराजांचा ‘पर्यावरणपूरक संदेश’ देणाऱ्या माहितीपटाद्वारे मार्गदर्शन केले. शाळेतील मुलांना ‘लाखमोलाची गोष्ट’, निसर्गखेळातून पर्यावरणाची जनजागृती, पथनाट्याद्वारे प्रात्यक्षिके करून राजाराम कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी प्रबोधन केले.
रॅलीच्या दरम्यान निसर्गमित्र अनिल चौगुले, दिनकर चौगुले, ‘राजाराम’च्या प्रा. डॉ. अंजली पाटील, प्रा. शामराव कांबळे, प्रा. अजित आकोळकर यांनी मार्गदर्शन केले, तर प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन राजाराम महाविद्यालयातील ३० विद्यार्थी-विद्यार्थिनींनी ‘निसर्गाकडे चला’चा संदेश देत रानमोडी तणांची माहिती दिली. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक, ग्रामस्थ, सार्वजनिक तरुण मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)
पर्यावरणाबाबत लोकांत सकारात्मक दृष्टिकोनाची कमतरता आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीला धोका निर्माण करणाऱ्या वस्तू नाकारण्याची मन:स्थिती तयार होऊ शकत नाही, तोपर्यंत पर्यावरण वाचू शकत नाही. लोकांनी पुनर्वापर आणि पुन:निर्मित वस्तूंचा वापर करायला हवा. तसेच नैसर्गिक साधनसंपत्तीतील घटकांचे लेखापरीक्षण होणे काळाची गरज आहे. त्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घ्यावा.
- अनिल चौगुले, निसर्गमित्र.
१८ गावांचा समावेश
पन्हाळा तालुक्यातील आसुर्ले, पोर्ले तर्फ ठाणे, माजगाव, शिंदेवाडी, माळवाडी, देवठाणे, कसबा ठाणे, महाडिकवाडी, म्हाळुंगे, दिगवडे, तिरपण, कोतोली, पिंपळे, वाघवे, उत्रे, आदी गावांतून रॅलीने प्रबोधन केले.