वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत महापालिकेचा वर्धापन दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:37 AM2020-12-16T04:37:44+5:302020-12-16T04:37:44+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या ४८ व्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवारी आयोजित केलेला ध्वजारोहण समारंभ तसेच वीरमाता, वीरपिता, वीरपत्नी यांचा सत्कार ...
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या ४८ व्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवारी आयोजित केलेला ध्वजारोहण समारंभ तसेच वीरमाता, वीरपिता, वीरपत्नी यांचा सत्कार समारंभ सर्व प्रमुख अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते पार पडला. वर्धापन दिनाऐवजी वरिष्ठ अधिकाऱ्यांची अनुपस्थिती मात्र दिवसभर चर्चेची ठरली.
प्रारंभी महानगरपालिकेच्या ४८ व्या वर्धापन दिनानिमित्त कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात प्रशासक बलकवडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी बोलताना प्रशासक बलकवडे यांनी महापालिकेला नंबर वन बनविण्यासाठी अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी, नागरिक यांनी एकजुटीने काम करण्याची आवश्यकता आहे,असे आवाहन केले.
महापालिकेचे प्रशासन गतिमान कसे होईल यासाठी प्राधान्य राहील. देशामध्ये कोल्हापूर महानगरपालिका एक नंबरला कशी येईल यासाठी सर्वांनी मिळून चांगले काम करूया. आपण दूरदृष्टी ठेवून विकासात्मक कामे केल्यास शहराचा नक्कीच विकास होईल. शहरातील नागरिकांच्या महापालिकेकडून अपेक्षा वाढलेल्या आहेत; त्या पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया, असे त्या म्हणाल्या.
यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, साहाय्यक संचालक (नगररचना) रामचंद्र महाजन, आरोग्याधिकारी डॉ. अशोक पोळ, उपशहर अभियंता एन. एस. पाटील, हर्षजित घाटगे, बाबूराव दबडे, नगरसचिव सुनील बिद्रे, अंतर्गत लेखापरीक्षक संजय भोसले, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, मुख्य अग्निशमन अधिकारी रणजित चिले, इस्टेट ऑफिसर सचिन जाधव, परवाना अधीक्षक राम काटकर, कामगार अधिकारी सुधारक चल्लावाड, सिस्टीम मॅनेजर यशपालसिंग रजपूत, प्रभारी जनसंपर्क अधिकारी मोहन सूर्यवंशी उपस्थित होते.
या अधिकाऱ्यांची होती अनुपस्थिती
एखाद्या संस्थेचा वर्धापन दिन म्हणजे एक आनंदाचा क्षण असतो. ज्या संस्थेचा आपण पगार घेतो, त्या संस्थेबद्दल, शहराबद्दल आदर, प्रेम व्यक्त करण्याचा तो दिवस असतो; परंतू अशा महत्त्वाच्या समारंभास उपायुक्त निखिल मोरे, साहाय्यक आयुक्त विनायक औंधकर, साहाय्यक आयुक्त चेतन कोंडे, संदीप घार्गे, रमेश मस्कर, जल अभियंता नारायण भोसले, शिक्षण समितीचे प्रशासनाधिकारी शंकर यादव अनुपस्थित होते. कोंडे व घार्गे समारंभ संपल्यानंतर आले. यापूर्वी कधी असे घडले नाही.