देवस्थानतर्फे कुंंकुमार्चन सोहळा उत्साहात, अंबाबाई दिनदर्शिकेचे प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2019 03:19 PM2019-12-25T15:19:27+5:302019-12-25T15:22:26+5:30
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या अंबाबाई दिनदर्शिकेचे समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्या हस्ते प्रकाशन झाले. यावेळी झालेल्या कुंकुमार्चन सोहळ्यात महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या अंबाबाई दिनदर्शिकेचे समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्या हस्ते प्रकाशन झाले. यावेळी झालेल्या कुंकुमार्चन सोहळ्यात महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने दरवर्षी श्री अंबाबाईची छायाचित्रे असलेली दिनदर्शिका प्रकाशित केली जाते. आगामी २०२० सालच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन मंदिर परिसरात झाले.
यावेळी कोषाध्यक्षा वैशाली क्षीरसागर, सदस्य शिवाजीराव जाधव, राजू जाधव, सचिव विजय पोवार, सहसचिव एस. एस. साळवी, व्यवस्थापक धनाजी जाधव उपस्थित होते. यावेळी स्वॅप मशीनचेही उद्घाटन झाले. या मशीनमुळे परस्थ भाविकांना अंबाबाई मंदिरासाठी देणगी देणे अधिक सोईस्कर झाले आहे.
यावेळी अध्यक्ष महेश जाधव यांनी पुढील काही दिवसांत पॅथॉलॉजी लॅब व डायग्नोस्टिक सेंटर उभारण्यात येणार असल्याची माहिती दिली. यामुळे कमी खर्चात आजाराचे निदान करता येणार आहे, तसेच समितीतर्फे अॅम्ब्युलन्सची सोय असणार आहे.
दिनदर्शिकेच्या प्रकाशनानंतर समितीच्या कार्यालयासमोर कुंकुमार्चन सोहळा घेण्यात आला. यात ७00 हून अधिक महिलांनी सहभाग घेतला. या सगळ्या महिलांना समितीतर्फे दिनदर्शिका देण्यात आली.
पुजारी सुदाम सांगळे व योगेश व्यवहारे यांनी पौरोहित्य केले. नवीन वर्षात दर शुक्रवारी कुंकुमार्चन विधी घेण्यात येणार असून, एकावेळी ५० महिलांना यात सहभाग घेता येईल.