नगरपंचायतीची घोषणा केवळ लोकप्रियतेसाठीच

By admin | Published: March 14, 2016 11:48 PM2016-03-14T23:48:48+5:302016-03-14T23:48:48+5:30

आजरा ग्रामपंचायत : नगरसेवक पदाची स्वप्ने पाहणाऱ्यांचा भ्रमनिरास

The announcement of the Nagar Panchayat is only for popularity | नगरपंचायतीची घोषणा केवळ लोकप्रियतेसाठीच

नगरपंचायतीची घोषणा केवळ लोकप्रियतेसाठीच

Next

ज्योतीप्रसाद सावंत -- आजरा ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर करण्याबाबतच्या विविध नेतेमंडळींकडून केल्या जाणाऱ्या घोषणा या केवळ सवंग लोकप्रियतेसाठीच असल्याचे स्पष्ट होत असून, गेली चार वर्षे नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाल्यानंतर नगरसेवक होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या मंडळींचा मात्र पुन्हा पुन्हा भ्रमनिरास होत आहे.
साडेतीन वर्षांपूर्वी आजरा ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक पार पडली. यावेळी ग्रामपंचायतीची नगरपंचायत होणार, असे सांगत तंटामुक्ती समितीने निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्नही केला. यामुळे इच्छा असूनही अनेक इच्छुकांनी निवडणूक प्रक्रियेपासून दूर राहणे पसंत केले. प्रत्यक्षात मात्र अद्याप ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर तर झालेले नाहीच; पण या चर्चेमुळे अनेकजण विनासायास सदस्य बनले आणि त्यांनी पदेही भोगली.

सरपंचपदाचीही अवस्था अशीच राहिली
नगरपंचायतीची टांगती तलवार असल्याने या पदासाठीही वेळोवेळी बराच संघर्ष झाला. कधी तीन, तर कधी सहा महिन्यांसाठी सरपंचपदी संधी दिली गेल्याने सरपंचपदाची शानही निघून गेली. दरम्यान, गेल्या साडेतीन वर्षांत ज्या-ज्या नेतेमंडळींनी ग्रामपंचायतीला भेट दिली, त्यांनी मात्र लवकरच आजरा ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर होणार, असे सांगितल्याने सरपंचपदाच्या संघर्षात भरच पडत गेली.


साडेतीन वर्षे झाली; पण ग्रामपंचायतीचे काही नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाले नाही. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आमदार हसन मुश्रीफ, सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील, राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्यासह सर्वांनी आजरा नगरपंचायत होण्यासाठी आपण प्रयत्न करू, असेही सांगितल्याने आजरेकरांच्या आशा या घोषणेकडे लागून आहेत.


एखाद्याने वर्षात, तर कुणी महिनाभरात
नगरपंचायत करण्याचे आश्वासन दिले होते; पण या घोषणा केवळ लोकप्रियतेसाठीच होत्या, हे स्पष्ट होत आहे. आणखी दीड वर्षांनी रितसर ग्रामपंचायतीची निवडणूक आहेच. त्यामुळे नेतेमंडळींनी अशा घोषणा थांबवून नगरपंचायत होण्यासाठी थेट आपली ताकद वापरण्याची गरज आहे.
४मुळातच दिशाहीन नेतृत्वामुळे आजरा तालुकावासीयांची फरफट होत असून, तालुक्यातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. हा प्रश्नही याचाच एक भाग आहे. नेतेमंडळींकडून सामूहिक प्रयत्न झाल्याशिवाय आजरा ग्रामपंचायतीची नगरपंचायत होणे सध्या तरी अडचणीचे दिसते.

Web Title: The announcement of the Nagar Panchayat is only for popularity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.