सदाभाऊंच्या नव्या रयत क्रांती संघटनेची घोषणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 04:50 PM2017-09-21T16:50:08+5:302017-09-21T18:04:24+5:30
कोल्हापूर, दि. २१ : कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज, गुरुवारी कोल्हापुरातील शाहू सांस्कृतिक मंदिरातील कार्यक्रमात रयत क्रांती संघटनेची घोषणा केली. संवादातून संघर्षाकडे असे संघटनेचे घोषवाक्य असून प्रदेशाध्यक्षपदी सुरेशदादा पाटील यांची निवड करण्यात आली असून येत्या ३0 सप्टेंबर रोजी उसाचा दर ठरविणार असून तोच अंतिम राहील, अशी घोषणाही यावेळी खोत यांनी केली.
सदाभाऊ खोत यांच्या नवीन शेतकरी संघटनेबाबत राज्यभर चर्चा होती. त्यानुसार गुरुवारी सदाभाऊंनी कोल्हापूरात येताच सर्वप्रथम अंबाबाईचे दर्शन घेतले आणि राज्यभरातून जमलेल्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत नव्या संघटनेची घोषणाही केली.
राजर्षी शाहू महाराजांचे आशीर्वाद घेऊन रयत क्रांती संघटनेच्या लोगोचे अनावरण सदाभाऊ यांनी केले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून काढून टाकल्यानंतर सदाभाऊ खोत यांनी नवीन संघटना स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गेले महिना-दीड महिना त्यांनी संपूर्ण राज्याचा दौरा करून कार्यकर्त्यांची मते अजमावून घेतल्यानंतर त्यांनी संघटना स्थापनेचा मुहूर्त ठरविला आहे. घटस्थापनेच्या मुहूर्तावर त्यांनी आपल्या या नवीन संघटनेची अधिकृत घोषणा केली.
राज्यमंत्री खोत यांनी गुरुवारी सकाळी करवीरनिवासिनी अंबाबाईचे दर्शन घेऊन दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले. त्यानंतर दुपारी शाहू मार्केट यार्ड येथील शाहू सांस्कृतिक मंदिर येथे मेळाव्यात जिल्ह्यातील शेतकºयांसमोर नव्या संघटनेची घोषणा केली.
या मेळाव्यात युवक आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी शार्दूल जाधव यांच्या नावाचीही घोषणा करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील, राजू सावंत, भरत पाटील आदी उपस्थित होते.
३0 सप्टेंबरला उसाचा दर जाहीर करणार
घटस्थापनेच्या मुहूर्तावर नवीन संघटनेची घोषणा करतानाच खोत यांनी इचलकरंजी येथे ३० सप्टेंबरला होणाºया दसरा मेळाव्यात उसाचा दर मीच ठरविणार आणि तोच अंतिम राहिल, अशी घोषणाही केली. याच मेळाव्यात संघटनेची पुढील दिशा स्पष्ट केली जाणार आहे.
राजू शेट्टीवर टीका करणे टाळले
कोल्हापूरात झालेल्या मेळाव्यात सदाभाऊ यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यावर टीका करणे टाळले. या मेळाव्यात त्यांनी कोणतेही वादग्रस्त वक्तव्य करणे टाळले.