मुलींना मोफत शिक्षण कधी?, द्यावा लागतोय विकास निधी; पालकांना भुर्दंड

By पोपट केशव पवार | Published: September 28, 2024 03:45 PM2024-09-28T15:45:17+5:302024-09-28T15:45:55+5:30

उच्च शिक्षण मोफत नावालाच 

Announcement of free higher education for girls but colleges are charging fees in the name of development fund | मुलींना मोफत शिक्षण कधी?, द्यावा लागतोय विकास निधी; पालकांना भुर्दंड

संग्रहित छाया

पोपट पवार 

कोल्हापूर : राज्यातील मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याची घोषणा करत सरकारने या निर्णयाची अंमलबजावणीही सुरू केली. मात्र, महाविद्यालये विकास निधीच्या नावाखाली शुल्क आकारत असल्याने हे कसले मोफत शिक्षण, अशी म्हणण्याची वेळ पालकांवर आली आहे.

व्यावसायिकाच्या ६०० अभ्यासक्रमांमध्ये मुलींना मोफत शिक्षण देण्याची घोषणा उच्च व तंत्र शिक्षण विभागाने केली. या निर्णयानुसार मुलींना शिक्षणासाठी एक रुपायाही भरावा लागणार नाही, असे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले होते.

मात्र, सध्या महाविद्यालये विकास निधीच्या नावाखाली विद्यार्थिनींकडून शुल्क आकारत आहेत. प्रत्येक महाविद्यालयांची विकासनिधीची रक्कम ही वेगवेगळी असून, पालकांना १५ ते ३० हजार रुपयांपर्यंत विकास निधी द्यावा लागत आहे. सरकारने केवळ शैक्षणिक शुल्क माफ केले. महाविद्यालयांमधील इतर शुल्काचा भुर्दंड मात्र विद्यार्थिनींना सोसावा लागत असल्याचे चित्र आहे.

प्रत्येक वर्षी द्यावा लागेल विकासनिधी

अभ्यासक्रमाचे शैक्षणिक शुल्क किती यावरून दहा ते पंधरा टक्के विकासनिधी शुल्क घेतले जाते. इंजिनिअरिंगचे शैक्षणिक शुल्क एक लाख रुपये असेल, तर दहा ते पंधरा हजार रुपये विकासनिधी द्यावा लागत आहे. चारही वर्षे हे शुल्क द्यावे लागणार आहे.

कर्ज काढण्याची वेळ

इंजिनिअरिंग, वैद्यकीय या व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शैक्षणिक शुल्क हे इतर अभ्यासक्रमांपेक्षा जास्त आहे. या शुल्काच्या दहा ते पंधरा टक्के रक्कम भरण्याची परिस्थितीही काही पालकांची नाही. त्यांना यासाठीही कर्ज काढावे लागते. त्यामुळे सरकारने जसे शैक्षणिक शुल्क माफ केले तसा विकासनिधीही महाविद्यालयांनी घेऊ नये, अशा सूचना देणे गरजेचे आहे.

काय माफ?
शैक्षणिक शुल्क, परीक्षा शुल्क

काय द्यावे लागणार?
विकासनिधी शुल्क, वसतिगृह शुल्क, महाविद्यालयांमधील उपक्रमांसाठीचे शुल्क

आधी पैसे भरा, नंतर परत करू
विद्यार्थिनींकडून एकही रुपया शैक्षणिक शुल्क घेऊ नका असे सरकारचे आदेश आहेत. मात्र, काही महाविद्यालये आधी पैसे भरा, नंतर परत करू, असे सांगत पैसे घेत असल्याचे चित्र आहे. यामुळे पालक संभ्रमात आहेत.

महाविद्यालयांनी विद्यार्थिनींकडून एकही रुपया शैक्षणिक शुल्क घेऊ नये, असे बंधनकारक आहे. जूनमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय किंवा त्यापुढील वर्गात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थिनींचे शैक्षणिक शुल्क माफ आहे. - डॉ. धनराज नाकाडे, सहसंचालक, उच्च व तंत्र शिक्षण, कोल्हापूर विभाग.

Web Title: Announcement of free higher education for girls but colleges are charging fees in the name of development fund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.