घोषणांनी जिल्हा परिषद दुमदुमली
By admin | Published: March 16, 2017 12:29 AM2017-03-16T00:29:31+5:302017-03-16T00:29:31+5:30
लेखा कर्मचारी संघटनेचे आंदोलन : शासनाने दखल न घेतल्यास १० एप्रिलनंतर आमरण उपोषण
कोल्हापूर : विविध दहा मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटनेने बुधवारी जिल्हा परिषदेसमोर आंदोलन केले. कार्यकर्त्यांच्या घोषणांनी जिल्हा परिषद परिसर दिवसभर दुमदुमला. अनेक मान्यवरांनी दिवसभरामध्ये आंदोलकांची भेट घेऊन त्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला.
आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात काळ्या फिती लावण्यात आल्या. यानंतर बुधवार (दि. १५) पासून ‘लेखणी बंद’ आंदोलन सुरू करण्यात आले. या आंदोलनामागची भूमिका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट करून १० एप्रिलनंतर शासनाने आंदोलनाची दखल न घेतल्यास संघटनेचे राज्याध्यक्ष विजयसिंह सूर्यवंशी व राज्य कार्यकारिणी यांच्या नेतृत्वाखाली धरणे व आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले.
जिल्हा परिषद लेखा संवर्गातील कर्मचाऱ्यांशी शासकीय कर्मचाऱ्यांच्या तुलनेत भेदभाव करणे, जिल्हा सेवा वर्ग ३ (लेखा) श्रेणी १ मध्ये असलेले पद ‘सहायक लेखा अधिकारी’ यांना राजपत्रित दर्जा देणे, ग्रेड पे, लेखा लिपिक परीक्षा, उपलेखापाल परीक्षा व लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र वित्त व लेखा (जि. प.) सेवा वर्ग ३ चीच शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे स्पर्धा परीक्षा जाहीर करणे, आदी मागण्या संघटनेने केल्या आहेत.
राज्य कार्यकारिणीचे सदस्य महावीर सोळांकुरे, युनियन अध्यक्ष धनाजी जाधव, कोषाध्यक्ष संतोष ओतारी, सुरेश पाटील, अनिल माळवे, वैशाली पवार, बी. डी. पाटील, अशोक पाटील, कास्ट्राईब संघटनेचे अध्यक्ष सुधाकर कांबळे, सचिव रवींद्र गस्ते, लेखा संघटनेचे संघटक किरण निकम, अभिजित पाटील यांच्यासह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष विमल पाटील, सभापती अभिजित तायशेटे, सीमा पाटील, पक्षप्रतोद शहाजी पाटील, माजी सदस्य अर्जुन आबिटकर आदींनी आंदोलनाला भेट दिली.