साडेनऊ हजार कोटींचा वार्षिक पतपुरवठा

By Admin | Published: April 12, 2017 01:19 AM2017-04-12T01:19:40+5:302017-04-12T01:19:40+5:30

जिल्हाधिकारी : कृषी, बचत गटांची उत्पादन क्षमता वाढीसाठी प्रयत्न

Annual credit worth Rs | साडेनऊ हजार कोटींचा वार्षिक पतपुरवठा

साडेनऊ हजार कोटींचा वार्षिक पतपुरवठा

googlenewsNext

कोल्हापूर : जिल्ह्यासाठी बँक आॅफ इंडिया या अग्रणी बँकेच्यावतीने सन २०१७-१८ या वर्षाकरिता ९ हजार ६२७ कोटींचा वार्षिक पतपुरवठा आराखडा तयार करण्यात आला असून, या आराखड्याचे प्रकाशन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या हस्ते करण्यात आले. या आराखड्यामध्ये कृषी व बचत गटांची उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी यंदाच्या आराखड्यात १३ टक्क्यांनी वाढ करण्यात आली. जिल्हास्तरीय बँकर्स कमिटीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत वार्षिक पतपुरवठा आराखडा अग्रणी जिल्हा प्रबंधक एस. जी. किणिंगे यांनी सादर केला.
या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, बँक आॅफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक बी. के. आरसेकर, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह चव्हाण यांच्यासह सर्व बँकांचे जिल्हा समन्वयक व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्णासाठी तयार करण्यात आलेल्या ९ हजार ६२७ कोटींचा वार्षिक पतपुरवठा आराखड्यामध्ये प्राथमिकता क्षेत्रासाठी ६ हजार ८१० कोटी रुपयांची तरतूद केल्याचे यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी सांगितले.
कृषी उत्पादनाला मिळणारे चांगले दर तसेच ८० टक्के शेतकरी बँकिंग व्यवस्थेखाली आणणे व त्याला लागणाऱ्या संलग्न सेवांसाठी २०१७-१८ या वर्षासाठी ३ हजार ४८० कोटी रुपयांची तरतूद केली तर यंत्रमाग तसेच इतर लघुउद्योगांसाठी २ हजार १४१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. इतर प्राथमिक क्षेत्रासाठी वाढ करून तब्बल १ हजार १८९ कोटी रुपयांची तरतूद केल्याचे यावेळी सांगण्यात आले.
जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री जनधन योजनेंतर्गत ८१६५६८ खाती उघडण्यात आली असून त्यापैकी ग्रामीण भागामध्ये ५७८०४८ खाती तर शहरी भागामध्ये २३८५२० खाती उघडण्यात आली आहे. ४७५०२४ खातेधारकांना रूपे एटीएम कार्डाचे वाटप करण्यात आले. या वर्षापासून विविध विमा कंपन्यांच्या सहकार्याने बँका ग्रामीण भागात आरोग्य विमा सेवा देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. यंदाच्या पतपुरवठा आराखड्याची अंमलबजावणी करताना सर्व बँकर्सनी शेतकरी, युवक, उद्योजक, बचतगट अशा व्यक्ती डोळ्यासमोर ठेवून नावीन्यपूर्ण योजना हाती घ्यावी, अशी सूचना करून जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी म्हणाले, यावर्षी जिल्ह्यासाठी प्रधानमंत्री जन-धन योजनेची अंमलबजावणी करणे (विमा व मुद्रा कर्ज योजना / बँक मित्र), सोलर पंप सेट योजना, पीक विमा योजना राबविणे, आर-सेटीद्वारे १००० तरुण व तरुणींना प्रशिक्षण देऊन व्यवसाय उभारणी करणे, अल्पसंख्याकांना एकूण कर्जवाटपाच्या १५ टक्के कर्जवाटप करणे असा पाचकलमी कार्यक्रम राबविण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

अडीच लाख शेतकऱ्यांना पीककर्जाचे वाटप
जिल्ह्यात आतापर्यंत ४५ हजार स्वयंसाहाय्यता बचत गट स्थापन करण्यात आले आहेत. २ लाख ५४ हजार ५३० शेतकऱ्यांना पीककर्जाचे वाटप करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना २ हजार ८३ कोटी ११ लाख रुपयांचे कर्ज वितरण करण्यात आले आहे. शेती, लघुउद्योग तसेच बचत गटांसाठी देण्यात येणारा कर्जपुरवठा मिळविण्यासाठी कर्जदारांनी बँकांकडे कर्जप्रकरण पाठविताना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी.

Web Title: Annual credit worth Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.