महात्मा फुले योजनेअंतर्गत आणखी १६५८ पात्र शेतकरी, ४८ हजार शेतकरी कर्जमुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 12:05 PM2020-07-23T12:05:06+5:302020-07-23T12:10:31+5:30
महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेल्या महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यातील आणखी १६५८ शेतकरी पात्र झाले आहेत. आतापर्यंत ४३ हजार ३३६ शेतकऱ्यांना २५५ कोटी २२ लाख रुपये कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. जिल्ह्यातील ४८ हजार २४९ शेतकरी कर्जमुक्त झाले आहेत.
कोल्हापूर : महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेल्या महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यातील आणखी १६५८ शेतकरी पात्र झाले आहेत. आतापर्यंत ४३ हजार ३३६ शेतकऱ्यांना २५५ कोटी २२ लाख रुपये कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. जिल्ह्यातील ४८ हजार २४९ शेतकरी कर्जमुक्त झाले आहेत.
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने दोन लाखांपर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आणली होती. कोल्हापूर जिल्ह्यातून ५१ हजार ४२६ शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी प्रस्ताव दाखल केले होते. त्यांतील ४६ हजार ५९१ शेतकरी पात्र झाले होते. त्यांपैकी ४५ हजार ५०९ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण केले. यांतील सर्वाधिक २९ हजार १७२ शेतकरी हे जिल्हा बँकेचे तर १३ हजार १३५ शेतकरी हे व्यापारी बँकांकडील आहेत. या दोन्ही बँकांकडील ४२ हजार ३०७ शेतकऱ्यांना २४९ कोटी ९८ लाख रुपये कर्जमाफीची रक्कम मिळाली होती.
मध्यंतरी कोरोनामुळे कर्जमाफी थांबली होती; मात्र खरीप हंगामात शेतकऱ्यांची अडवणूक होऊ नये, म्हणून महाविकास आघाडी सरकारने कर्जमाफीच्या कामास पुन्हा गती दिली. त्यानुसार २१ जुलै रोजी जिल्हा बँकेचे १०२९ शेतकऱ्यांचे पाच कोटी २४ लाख रुपये आले. त्याचबरोबर व्यापारी बँकांचीही यादी आली आहे.
दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यातील १६५८ पात्र शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर आली असून, आतापर्यंत जिल्ह्यातील ४८ हजार २४९ शेतकरी कर्जमुक्त झाले आहेत. ज्यांचे आधार प्रमाणीकरण झालेले नाही, त्यांनी लॉकडाऊन संपताच त्याची पूर्तता करून घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी पत्रकातून केले आहे.
महापुरातील कर्जमाफीचे पैसे ऑगस्टमध्ये
मध्यंतरी महापुरातील ४१ कोटी रुपये जिल्ह्यासाठी आले होते. त्यातून पावसाने झालेली पडझड व शेतीच्या नुकसानीचे पैसे देण्यात आले. मात्र अद्याप कर्जमाफीपासून काही शेतकरी वंचित आहेत. त्यासाठी पुरवणी यादीतून जिल्ह्यासाठी २५ कोटींची मागणी केली असून साधारणत: १० ऑगस्टपर्यंत हे पैसे उपलब्ध होतील.